एखाद्याचा डीएसके होणे!

0

मराठी तरुणांनी नोकर्‍या सोडून उद्योगाकडे वळावे, असा सल्ला देणारे डीएसके स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडत आहेत. एक काळ असा होता हा उद्योगपती कुण्या राजकारणी माणसाला लवकर जवळ करत नव्हता. आज तो संकटात सापडला आहे, तर मदतीसाठी कधी राज ठाकरे तर कधी अजित पवारांना साकडे घालतो आहे. न्यायालयाने वारंवार तंबी देऊनही 50 कोटी रुपयांची रक्कम न्यायालयात जमा न करता येऊ शकणारा हा उद्योगपती कधीकाळी अब्जावधींच्या रकमेत खेळत होता, हे कुणाला सांगितले तर विश्‍वास बसत नाही.

दीपक सखाराम कुलकर्णी उपाख्य डीएसके हे पुणे, मुंबईतील बांधकाम क्षेत्रातील तसे मोठे नाव. या माणसाने लोणचे विकण्यापासून ते पेपर टाकण्यापर्यंतची सर्व कामे केलीत. अथक कष्टातून त्यांनी बांधकाम व्यवसायाचे विश्‍व उभे केले. कोणत्याही मराठी माणसाला हेवा वाटावा, अशी डीएसकेंची गगनभरारी आहे. माणसांची स्वप्ने अमर्याद आहेत, पैसा हाती खुळखुळू लागला की या स्वप्नांना काय पंखच फुटतात, तसे पंख डीएसकेंनाही फुटले. प्रचंड गुंतवणुकीचे बांधकाम प्रकल्प त्यांनी हाती घेतले. पुण्यातील ग्राहक, त्यांची क्रयशक्ती आणि या प्रकल्पातून मिळणारे उत्पन्न यांचा ताळमेळ न राखता हा माणूस ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पैसा ओतू लागला, त्यासाठी समाजातून पैसा गोळा करू लागला. खरे तर समाजाचा पैसा हा विषासारखा असतो, हे सत्य डीएसकेंना वेळीच कळले असते तर आज हा माणूस उद्ध्वस्त झाला नसता. ते ज्यावेळेस पैशाच्या आणि स्वप्नांच्या धुंदीत होते त्यावेळेत हे सत्य त्यांना कळू शकले नाही. नरेंद्र मोदी यांच्यासारख्या सनकी पंतप्रधानाने एकाच दणक्यात हजार अन् पाचशेच्या नोटा बंद केल्या, त्यानंतर लगेच जीएसटी कायदा लागू केला अन् ते होत नाही तोच रेरा कायदाही लागू केला. झाले! एका क्षणात डीएसके अन् त्यांच्यासारखे बांधकाम व्यावसायिक देशोधडीला लागले. ज्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर कमी होता, त्यांना सावरता आले. ज्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर होता. परंतु, ती व्यावसायिक बँकांची कर्जे होती अन् त्या तुलनेत मालमत्तांचे भरभक्कम तारण होते, तेही सावरले. परंतु, लोकांकडून पैसा गोळा करून तो उद्योगात वापरणारे डीएसके मात्र पुरते उद्ध्वस्त होऊन बसले.

संकटे कधीच एकटी दुकटी येत नसतात. ती समूहाने येतात. डीएसकेंचा अपघात आणि त्यानंतर अत्यंत वेगाने घडलेल्या या घडामोडी पाहता, सावरण्याची काहीही संधी न देता डीएसकेंना देशोधडीला लावून संकटे अद्यापही शांत झालेली नाहीत. लोकांनी डीएसकेंच्या उद्योगात पैसा गुंतवला होता, तो त्यांनी परत मागितला आहे. ठेवीदारांच्या या ठेवी परत करण्यात डीएसकेंना अपयश येत आहे. या संधीचा डीएसकेंचे व्यावसायिक विरोधक फायदा घेणार नाही असे तर होणे नाही! त्यामुळे त्यांचे व्यावसायिक विरोधकही डीएसकेंना आणखीच अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. ठेवीदार व गुंतवणूकदारांनी फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे अटकपूर्व जामीन घेणे गरजेचे बनले असताना न्यायालयाने ठेवीपोटीच्या एकूण रकमेपैकी 50 कोटींची रक्कम तातडीने न्यायालयात भरण्याचे आदेश दिले आहेत. एवढी रक्कमही डीएसके न्यायालयात भरू शकले नाहीत. तेवढेही पैसे त्यांच्याकडे नाहीत. डीएसकेंना अटक करणे व तुरुंगात डांबणे ही बाब न्यायसंस्थेसाठी अगदीच सोपी आहे. परंतु, डीएसकेंना तुरुंगात डांबले तर लोकांचे पैसे कोण परत करणार? हा सवाल न्यायालयालाही सतावतो आहे. त्यामुळे न्यायदेवता डीएसकेंना तुरुंगात न टाकता तातडीने पैसे भरण्यासाठी दबाव आणत आहे. वारंवार फटकारूनही डीएसके पैसे भरण्यास अपयशी ठरले, तर मात्र दुर्दैवाने कुलकर्णी दाम्पत्यापैकी एकाला तरी तुरुंगात डांबण्याचा कटू निर्णय न्यायदेवतेला घ्यावा लागणार आहे. डीएसकेंकडे पैसे नाहीत. ज्या मालमत्ता आहेत, त्या मालमत्ता कर्जापोटी बँकांकडे तारण आहेत. मालमत्ता विक्रीस काढल्या तरी कर्जवजा जाऊन लोकांची देणी देण्यासाठी लागणारी रक्कमही जुळत नाही, इतक्या कमी किमतीत या मालमत्ता खरेदीदारांकडून मागितल्या जात आहेत. अर्थात, ती हेतूपुरस्सर केली जात असलेली कोंडी आहे. पुण्यात अनेक बांधकाम व्यावसायिक जसे काम करतात तसेच काही बांधकाममाफियादेखील कार्यरत आहेत. या बांधकाममाफियांनीच डीएसकेंची मोठी कोंडी करून ठेवली असून, अखेर थकलाभागला डीएसके आपल्या दारात येईलच, अशी वाट ही मंडळी पाहत आहेत. दुर्दैवाने डीएसकेंना यापैकी काही लोकांच्या दारी जाण्याचीही वेळ आली आहे. लोकांचा मोठ्या संख्येने विश्‍वास उडत असताना, हा विश्‍वास टिकवून ठेवण्यासाठी डीएसकेंनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना साकडे घातले होते. त्यानुसार, राज पुण्यात आले, डीएसकेंच्या पाठीशीही उभे राहिलेत. त्यांच्या या पुणेभेटीमुळे डीएसकेंविरोधात गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण घटले. परंतु, आर्थिक संकटे काही संपुष्टात येण्याचे नाव नाही.

या संकटातून बाहेर पडण्यासाठी कालच डीएसकेंनी अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली. पवार हे पुण्यातीलच नव्हे राज्य अन् देशातील मोठे नाव, संकटात सापडलेल्या माणसाला त्या संकटातून बाहेर काढण्याची हातोटी पवारांना चांगल्याप्रकारे अवगत आहे. डीएसके हे पवारशरण झालेच आहे तर नक्कीच पवार त्यांना या संकटातून बाहेर काढतीलच; यात काहीही शंका नाही. जी व्यावसायिक विरोधक मंडळी डीएसकेंच्या मालमत्ता कवडीमोल भावात मागत आहेत, ती पवारांचीच माणसे आहेत. त्यामुळे डीएसकेंच्या मालमत्तांना योग्य बाजारमूल्य मिळाले, तरी पवारभेटीचा लाभ डीएसकेंना होऊ शकेल. पवार हे डीएसकेंना काय मदत करू शकतात? असा प्रश्‍न जर कुणाच्या डोक्यात घोळत असेल, तर पवार हे डीएसकेंना काही मदत करू शकत नाही? असा उलट सवाल त्यांना करावासा वाटेल. पुण्यातील इंच अन् इंच जमिनीचा हिशोब पवारांनाच ठाऊक आहे. त्यामुळे पवार हेच डीएसकेंना या मोठ्या संकटातून बाहेर काढू शकतात, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. भली मोठी स्वप्ने आणि त्यासाठी अचाट आर्थिक व्यवहार करणार्‍या डीएसकेंनी भविष्याचा वेध न घेता काम केले. त्याचमुळे आज ते देशोधडीला लागले आहेत. माणूस हा चुकांचा पुतळा आहे, असे राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणत असत. डीएसके चुकलेत. परंतु, ते विजय मल्ल्यासारखे पैसे बुडवून पळून गेले नाहीत. त्यांना साथ देणे आणि मदतीचा हाथ देणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे. आर्थिक संकटे काय आज आहेत, उद्या ती निघूनही जातील. पवारांनी साथ दिली तर डीएसके लवकरच या संकटातून बाहेरही येतील. परंतु, डीएसकेंसारखा मराठी उद्योजक जिवंत राहणे गरजेचे आहे. एखाद्याचा डीएसके होणे म्हणजे काय? या म्हणीचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर आज डीएसकेंवर बेतलेली वेळ आणि ते ज्या परिस्थितीला सामोरे जात आहेत, ते पाहावे!