पिंपरी-चिंचवड : केंद्रीय मंत्रिमंडळाने हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (एच.ए.) कंपनीच्या कामगारांची थकित देणी, स्वेच्छा निवृत्ती योजना (व्ही.आर.एस.), अतिरिक्त जमीन विक्री इत्यादी संदर्भात निर्णय घेऊन एक वर्ष झाले. मार्च 2017 मध्ये कामगारांचे 28 महिन्यांचे वेतन मिळाले. मात्र इतर बाबी प्रलंबित आहेत. शिवाय पुन्हा आठ महिने पगार मिळालेला नाही. याचा पाठपुरावा करण्यासाठी एचए कामगार संघटनेचे (एचएएमएस) पदाधिकारी नुकतेच दिल्लीला गेले होते. ज्येष्ठ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू, रसायन राज्यमंत्री मनसुख मांडविया, माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या भेटी घेऊन पुढील कार्यवाहीबाबत प्रयत्न करण्याची मागणी केली.
डिसेंबर 2016मध्ये झाले होते निर्णय
एचए कंपनीची सर्व देणी भागविण्यासाठी कंपनीने 821 कोटींचा पुनर्वसन प्रस्ताव सरकारकडे सादर केला होता. त्यानंतर सरकारने केंद्रीय अर्थमंत्री श्री अरुण जेटली, परिवहन मंत्री श्री नितीन गडकरी आणि रसायन मंत्री श्री अनंतकुमार यांची समिती (मंत्रीगट) नेमली होती. श्री शरद पवार यांनीही पंतप्रधान व या मंत्रीगटाशी चर्चा केली होती. त्यानंतर डिसेंबर 2016 मध्ये मंत्रिमंडळाने एचए ची अतिरिक्त जमीन विक्री करून रक्कम उभी करण्याचा निर्णय घेतला.
कामगारवर्ग हवालदिल
जमीन विक्रीतून सर्व थकीत देणी आणि कामगारांना व्ही.आर.एस. साठीची तरतूद करण्यात आली. तसेच थकीत पगार व अत्यावश्यक गरजांसाठी शंभर कोटी रुपये देण्यास मान्यता दिली. त्यानुसार मार्च 2017 मध्ये कामगारांना थकीत पगार मिळाला. मात्र इतर बाबी प्रलंबित आहेत. पुन्हा आठ महिने थकलेला पगार, न आलेली व्ही.आर.एस. आणि जमिनविक्रीस न मिळालेला प्रतिसाद यामूळे कामगार हवालदिल झाले आहेत. त्यादृष्टीने पाठपुरावा करण्यासाठी एचएएमएस चे सरचिटणीस सुनिल पाटसकर आणि उपाध्यक्ष अरुण बोर्हाडे यांनी दिल्लीमध्ये विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या.
पेनिसिलीन उत्पादन सुरु करा
कंपनीच्या पुनर्वसनासाठी पेनिसिलीनचे (पे-जी) उत्पादन पुन्हा सुरु करावे. भारत आणि सिरीया या देशांमध्ये देवाणघेवाणीच्या चर्चा सुरु असून, एचए मध्ये पेनिसिलीन उत्पादन सुरु केल्यास भारताकडून सिरीयाला सिफोलोस्फोरीन, बिटालक्टीन, आय.व्ही.फ्ल्यूड आणि अन्य प्रकारची औषधे पुरवता येतील. यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा आवश्यक त्या परवानग्या द्याव्यात, अशी मागणी एच.ए. मजदूर संघाने नवी दिल्ली येथे वाणिज्य मंत्री श्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली. यासंदर्भात त्यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. या अनुषंगाने प्रभू यांनी सकारात्मक भूमिका घेऊन ’स्टेट ट्रेडिंग कार्पोरेशन’ ला एच.ए.ची उत्पादने सिरीयाला निर्यात करण्यासंदर्भात अहवाल तयार करण्याच्या सुचना दिल्या. तसेच पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहाय्याने एच.ए.ची उत्पादने निर्यात करण्याचा प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.