मुंबई-एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्दार्थ सांघवी यांची हत्या करुन त्यांचा मृतदेह कल्याणमध्ये टाकून देण्यात आला होता. त्यांच्या शरिरावर जखमा आढळल्या असून, १३ वेळा त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आले होते. शर्टच्या खिशात असणारे ओळखपत्र, पट्टा आणि बुटांच्या सहाय्याने त्यांच्या वडील आणि भावाने मृतदेहाची ओळख पटवली होती.
केईएम रुग्णालयात सिद्धार्थ सांघवी यांच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात आले. यावेळी सिद्धार्थ सांघवी यांचा मागून गळा कापण्यात आल्याचे समोर आले. गळा कापल्यानंतर त्यांच्यावर १३ वेळा चाकूने वार करण्यात आले. अत्यंत धारदार शस्त्राने गळा कापण्यात आला होता. सिद्धार्थ सांघवी बेशुद्ध पडल्यानंतर पुन्हा त्यांच्यावर वार करण्यात आले असे डॉक्टरांनी सांगितले.
सिद्धार्थ सांघवी यांच्या हातालाही एक जखम झाली आहे, ज्यावरुन त्यांनी बचाव करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट होत आहे. सिद्धार्थ सांघवी तीन गंभीर जखमा झाल्या होत्या, यापैकी दोन यकृताला तर तिसरी आतड्याला झाली होती. त्यांच्यावर पायावरही जखमा आहेत. फॉरेन्सिक एक्स्पर्टने अत्यंत नियोजन करुन ही हत्या केली असल्याचे सांगितले आहे.
एचडीएफसीमध्ये उपाध्यक्षपदावर कार्यरत असलेल्या संघवी यांचे लोअर परेल येथील कमला मिल येथे ऑफीस आहे. बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे आपल्या कार्यालयातून बाहेर पडले, मात्र ते घरी पोहोचलेच नाहीत. सायंकाळी वेळेत घरी न पोहोचल्याने त्यांच्या कुटुंबियांनी एन. एम. जोशी मार्ग पोलिस स्थानकात हरविल्याची तक्रार दाखल केली होती.
तपासात संघवी यांची चारचाकी गाडी नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे सापडली. गाडीच्या सीटवर रक्ताचे डाग आणि चाकू सापडला. या कारमध्ये पोलिसांना एका चाकूसह मोठ्या प्रमाणात रक्ताचे डाग आढळून आल्याने मुंबई पोलिसांसह नवी मुंबई पोलिसांनी देखील संघवी यांची कार कोपरखैरणे भागात आणणाऱ्याचा माग काढण्यास सुरुवात केली होती. अखेर कोपरखैरणेतील बोनकोडे भागात रहाणाऱ्या सरफराज शेख याने संघवी यांची कार तिथे आणल्याचे सीसीटीव्ही व मोबाइल संभाषणाच्या तांत्रिक तपासाद्वारे आढळून आले. तसेच या कारची चावी सरफराजच्या घरी आढळली. त्यामुळे पोलिसांनी त्याला रविवारी सकाळी ताब्यात घेतल्यानंतर त्याने संघवी यांच्या हत्येची कबुली दिली.