मुंबई-एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्षपदावर कार्यरत असलेल्या बेपत्ता सिद्धार्थ संघवी यांची हत्या झाली असल्याचा दावा या कटातील आरोपीकडून करण्यात आला आहे. पोलिसांना या प्रकरणी तपास करत असताना एक आरोपी हाती लागला असून त्याने याबाबत कबुली दिली आहे. मात्र अद्याप संघवी यांचा मृतदेह सापडलेला नसून ही हत्या करण्यामागे नेमके काय कारण होते हे समोर आलेले नाही.
संघवी यांचे लोअर परेल येथील कमला मिल येथे ऑफीस आहे. नेहमीप्रमाणे ते सकाळी ऑफीसला आले. मात्र सायंकाळी वेळेत घरी न पोहोचल्याने त्यांच्या कुटुंबियांनी एन. एम. जोशी मार्ग पोलिस स्थानकात हरविल्याची तक्रार दाखल केली होती.
संघवी पत्नी आणि चार वर्षांच्या मुलासह मलबार हिल येथे राहतात. मिसिंगची तक्रार दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. त्यांची चारचाकी नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे सापडली आहे. गाडीच्या सीटवर रक्ताचे डाग असल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. या हत्येमागे वैयक्तिक कारण असल्याचेही ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीने सांगितले आहे. पुढील प्रकरणाचा तपास सुरु असून या प्रकरणातील इतर आरोपींचा मुंबई आणि नवी मुंबई पोलीस शोध घेत आहेत. आरोपी सतत आपला जबाब बदलत असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.
बुधवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास संघवी ऑफीसमधून निघाले. कार्यालयातून बाहेर पडताना ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसले. मात्र, कमला मिलमधून त्यांची कार बाहेर पडताना दिसली नाही’, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. कमला मिलमधून बाहेर पडण्यापूर्वीच संघवी यांचा फोन बंद होता. रात्री १० पर्यंत संघवी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, त्यामुळे त्यांच्या पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली.