हैदराबाद : हैदराबाद क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदासाठी माजी कर्णधार महंमद अझहरुद्दीन याने केलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी के. राजीव रेड्डी यांनी महंमद अझहरुद्दीनचा अर्ज फेटाळत बीसीसीआयने अजहरवर मॅच फिक्सिंग प्रकरणी घातलेल्या आजन्म बंदीबाबत समाधानकारक स्पष्टीकरण दिले नसल्याचे म्हटले आहे. 17 जानेवारीला ही निवडणूक होणार आहे.
न्यायालयाने दिला आहे बाजूने निकाल
लोढा समितीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे अर्शद अयूब यांना पद सोडावे लागले होते. अजहरवर “बीसीसीआय’ने 2000 मध्ये मॅच-फिक्सिंगबद्दल आजन्म बंदी घातली आहे. अजहरने त्यास न्यायालयात आव्हान दिले. आंध्र उच्च न्यायालयाने 2011 मध्ये त्याच्या बाजूने निकाल दिला, पण “बीसीसीआय’ने बंदी अधिकृतरीत्या कधीच उठविली नाही. सलग तीन विश्वकप स्पर्धेत (१९९२, १९९६ व १९९९) भारताचे नेतृत्व करणारा आणि भारताचे सर्वांत अधिक वेळ कर्णधारपद भूषविणाऱ्यांपैकी एक असलेल्या अझहरुद्दीनवर वर्ष २००० मध्ये मॅच फिक्सिंग प्रकरणात समावेश असल्याचा ठपका ठेवत बीसीसीआयने आजीवन बंदी घातली होती.
प्रदीर्घ काळ कायद्याची लढाई
अझहरुद्दीनने प्रदीर्घ काळ कायद्याची लढाई लढली आणि २०११ मध्ये आंध्र उच्च न्यायालयाने त्याच्या बाजूने निर्णय दिला, पण बीसीसीआयने अद्याप त्याच्यावरील आजीवन बंदीचा निर्णय अधिकृतपणे रद्द केलेला नाही. माजी खेळाडूंना मिळणारे पेन्शन (निवृत्ती मानधन) त्याला अद्याप मिळालेले नाही. आपल्या उमेदीच्या काळात सर्वोत्तम शैलीदार फलंदाजांपैकी एक असलेल्या अझहरने भारतातर्फे ९९ कसोटी सामन्यांत २४ शतके ठोकली आणि ६००० पेक्षा अधिक धावा फटकावल्या आहेत.