एच.दिव्यांगने झळकवले शानदार शतक
खडकी : फल्लाह क्रिकेट अॅकॅडमीच्यावतीने आयोजित एफ.सी.टी.20 युनिक पिंक बॉल लीग स्पर्धेत एच.एम.ए.के.स्पोर्टस मॅनेजमेंट संघाने इलेव्हन वॉरिअर संघाचा 122 धावांनी पराभव करीत दणदणीत विजय मिळवला. एच.दिव्यांगने झळकविलेल्या 46 बॉलमध्ये 107 धावांच्या बळावर एचएमएकेने हा शानदार विजय प्राप्त केला. येथिल फल्लाह क्रिकेट अॅकॅडमीच्यावतीने क्रँसालीस क्रिकेट मैदानात मर्यादीत टी-20 सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील पहिला सामना एचएमएके विरुद्ध इलेव्हन वॉरिअरमध्ये खेळला गेला. एमएमएके संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात दोन गडी बाद 231 धावांचा डोंगर रचला.
दिव्यांग ठरला सामन्याचा मानकरी
एच.दिव्यांगच्या शानदार 46 बॉलमधील 107 धावांच्या जोरावर हा धावांचा डोंगर रचला गेला. एच.एम.ए.के.च्या 231 धावांचा पाठलाग करताना इलेव्हन वॉरिअर संघाचा डाव सर्व गडी बाद 119 धावात आटोपला गेला. शानदार शतक झळकवणारा एच.दिव्यांग हा स्पर्धेचा मानकरी ठरला. स्पर्धेतील दुसरा सामना एस.एस.जी.विरुद्ध एचएमएके संघात खेळण्यात आला. एस.एस.जी.ने नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. एच.एम.ए.के.च्या भेदक गोलदाजी समोर एस.एस.जी.संघाने कात टाकत 20 षटकात सर्व गडी बाद केवळ 68 धावा केल्या. एच.एम.ए.के.ने अवघ्या 6 षटकात एक गडीच्या मोबदल्यात 72 धावा करीत एस.एस.जी.संघावर नऊ गडी राखुन विजय मिळविला. एच.एम.ए.के.च्या सचिन तावरे याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या बळावर हा शानदार विजय मिळवला. 3 षटकात 16 धावांच्या मोबदल्यात तीन गडी बाद करणारा तावरे हा स्पर्धेचा मानकरी ठरला. फल्लाह क्रिकेट अॅकॅडमीचे सय्यद फल्लाह यांच्या हस्ते खेळाडू दिव्यांग व तावरे यांना स्पर्धेचे मानकरी पारितोषीकाचे वितरण करण्यात आले.