एच. पी. गॅस पाइपलाइनसाठी संपादित जमिनीचा योग्य मोबदला द्या

0

शेलपिंपळगाव । एच. पी. गॅस पाइपलाईनसाठी संपादित केलेल्या जमिनींचा योग्य मोबदला मिळावा म्हणून खेड तालुका शेतकरी संघटनेने प्रांताधिकारी कार्यालयाला निवेदन दिले आहे.उरण ते शिक्रापुर येथे एच. पी. गॅस पाइपलाइन प्रस्तावित आहे. त्यासाठी तेथील शेतकर्‍यांच्या जमिनी संपादीत केल्या आहेत. वाकी बु., काळुस, भोसे, दौंडकरवाडी, बहुळ या गावातील बाधित शेतकर्‍यांच्या सातबारा उतार्‍यावर इतर अधिकारात कंपनीच्या नावाची नोंद करण्यात यावी, असे कंपनीचे म्हणणे आहे. त्याला शेतकरी संघटनेचा विरोध असून याबाबतचे निवेदन खेड तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब दौंडकर, कार्याध्यक्ष सुभाष पवळे, उपाध्यक्ष वस्ताज दौंडकर, जालना जिल्हा अध्यक्ष गजानन राजबिंडे यांच्यासह उपस्थित शेतकर्‍यांनी नायब तहसीलदार राजेश कानसकर यांना दिले.

बाजारभावापेक्षा पाचपट मोबदला द्या
सातबारावरील नोंदीसाठी शासकीय व कंपनीचे अधिकारी शेतकर्‍यांवर दबाव आणू पाहत आहेत. इतर अधिकारात कंपनीच्या नावाची नोंद झाल्यास शेतकर्‍यांच्या मालकीची जमीन असूनही तिच्या विक्री, विकसन कामी शेतकर्‍यांना अडचणी येऊन कवडीमोल बाजार भावाने मोबदला मिळेल. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार आहे. इतर अधिकारात कंपनीच्या नावाची नोंद करायची असेल तर संपादीत जमिनींसाठी चालू बाजार भावाच्या पाचपट मोबदला द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.

शेतकर्‍यांचा तीव्र विरोध
वेळो वेळी याबाबत निवेदन देऊनही सरकार याकडे दुर्लक्ष करून पोलिस बळाचा वापर करण्याचा प्रयत्न करीत आहे. आता या मागणीकडे दुर्लक्ष करून काम चालू ठेवण्याचा प्रयत्न केल्यास शेतकरी संघटना तालुक्यातील शेतकर्‍यांसह याचा तीव्र विरोध करणार असून याची संपूर्ण जबाबदारी शासनाची असेल, असा इशारा शेतकरी संघटनेने निवेदनाद्वारे शासनाला दिला आहे.