लोणावळा : चाकण एम.आई.डी.सी. मधील एच. पी. पल्झर ऑटोमोटिव्ह प्रा. ली. या कंपनीमध्ये काम करणार्या कामगारांवर होणार अन्याय दूर करून सर्व कामगारांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन शिवक्रांती कामगार सेनेचे सरचिटणीस अॅड. विजय पाळेकर यांनी येथे दिले. या कंपनीमध्ये काम करणार्या कामगारांच्या मेळाव्यात ते बोलत होते. हा मेळावा लोणावळ्यातील हॉटेल चंद्रलोकमध्ये पार पडला. मागील 7 ते 8 वर्ष कंपनीमध्ये काम करूनही मिळणारा कमी पगार, सोयीसुविधांचा अभाव, अधिकारी वर्गाकडून सातत्याने दिला जाणारा त्रास तसेच काम करताना त्यांना सोसाव्या लागणार्या अन्यायाचा पाढाच वाचला.
शिवक्रांतीने न्याय मिळवून द्यावा
शिवक्रांती संघटनेने आजवर हजारो कामगारांना न्याय मिळवून दिला असून आम्हालाही न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. मेळाव्याला गुलाबराव मराठे, राजेंद्र पवार, रवींद्र साठे, चंद्रकांत ढाकोळ आणि कामगार उपस्थित होते. पाळेकर यांनी कामगारांना मार्गदर्शन करताना देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष होऊनही कामगारांना पारतंत्र्यात असल्यासारखी वागणूक मिळत असेल तर संघटना अशा कामगारांच्या पाठीमागे भक्कमपणे उभी राहील. खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारी संघटना कामागारांसोबतच कंपनी व्यवस्थापनावरही अन्याय होऊ देणार नाही याची काळजी घेईल असेही ते म्हणाले.