एटापल्लीत नक्षलवाद्यांचे पोस्टर

0

एटापल्ली । गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील गट्टा-जांबिया, तुमरगुंडा, कसनसुर, मंगेर अशा दुर्गम भागात व तहसिल कार्यालयापासून काही अंतरावर नक्षलवाद्यांनी पोस्टर लावून 26 जुलै ते 3 ऑगस्टदरम्यान शहिद सप्ताह साजरा करण्याचे जनतेला आवाहन केले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी नक्षलवाद्यांचे आवाहन पाळले नाही तर, नक्षलवादी या भागात हल्ला करू शकतात, अशी भीती नागरिकांमधून वर्तवली जात आहे.

पोलीस यंत्रणा असते सतर्क
तसेच दुर्गम भागातील वाहतूक प्रभावित होत असुन नक्षली टार्गेटवर असणारे पुढारी, प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी, पोलीस किंवा सामान्य नागरिक यांना लक्ष्य करून जीवे मारण्याचा प्रयत्न नक्षल्यांकडून केला जातो. मात्र, पोलिस यंत्रणा सतर्क राहत असल्याने गेल्या अनेक वर्षांत या काळात कोणतीही घटना घडलेली नाही. नक्षलवाद्यांनी पोस्टरबाजीतून नागरिकांना आव्हान केल्यानंतर पोलीस यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सप्ताहाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात येते आहे.

दरवर्षी जुलै-ऑगस्ट दरम्यान माओवादी संघटनेकडून शहीद सप्ताह साजरा केला जातो. यावेळी माओवादी चळवळ स्थापनेपासून विविध घटनेत मारल्या गेेलेल्या नक्षल्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दुर्गम भागातील जंगल परिसरात स्मारके उभारून श्रद्धांजली कार्यक्रम घेतला जातो.

युद्धासाठी सज्ज होण्याचा संदेश
शोषित समाजाच्या हितासाठी शासनाशी लढताना शहीद झालेल्या नक्षल चळवळीतील अमर योद्धयांच्या स्मृती जागृत ठेवत फासीवादी शासनाविरुद्ध युद्ध पुकारण्यास सज्ज रहा, असाही उल्लेख या पोस्टरमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे नक्षलवादी यावेळी पूर्ण तयारीनिशी असल्याचे संकेत त्यांनी या संदेश मधून दिला आहे. तसेच, नक्षलवाद्यांकडून यंदाच्या सप्ताहामध्ये शासनाविरुद्ध युद्ध पुकारणार असल्याचेही स्पष्ट सांगितले आहे.