‘एटीएम’मधील 16 बॅटर्‍या, दोन युपीएस लंपास

0

एटीएमच्या सुरक्षेचे धिंडवडे; पैसे, यूपीएस नंतर बॅटर्‍यांची देखील चोरी 

पिंपरी-चिंचवड : शहरात एटीएम केंद्रांच्या सुरक्षेचे अक्षरशः धिंडवडे निघाले आहे. बँक प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे तसेच शहरात बोकाळलेल्या भुरट्या चोरांमुळे एटीएम मधील पैसे, युपीएस चोरीच्या प्रकरणानंतर आता एटीएममधील बॅटर्‍यांच्या देखील चोर्‍या होऊ लागल्या आहेत. सांगवी आणि पिंपळे गुरव मधील एटीएम मधील चक्क 16 बॅटर्‍यांची आणि 2 युपीएसची चोरी झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. बॅटरी चोरांनी 1 लाख, 74 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

सांगवी, पिंपळेगुरवमधील घटना
याबाबत सचिन काळगे (वय 30, रा. अश्‍विनी सुपर मार्केट, सांगवी पुणे) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही चोरी 30 जानेवारी ते 15 फेब्रुवारी, 2018 दरम्यानच्या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 11 या वेळेत करण्यात आली आहे. यामध्ये सृष्टी चौक येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम सेंटर, रामकृष्ण मंगल कार्यालय-त्रिमूर्ती चौक, पिंपळे गुरव आणि जुनी सांगवी या परिसरातील बँक ऑफ इंडिया बँकेचे तीन एटीएम सेंटर मधील एकूण 16 बॅटर्‍या आणि 2 युपीएस असा ऐवज चोरला आहे.

भंगारात चांगली किंमत
एटीएम सेंटर मध्ये वापरण्यात येणा-या बॅटरी भंगारात विकल्यास त्याची चांगली किंमत येते. एका एटीएम सेंटरमध्ये सुमारे चार ते सहा बॅटरीसंच लावलेले असतात. या बॅटरी चोरण्यासाठी शहरात अशा भुरट्या चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. शहरातील एटीएम सेंटर पूर्णतः असुरक्षित बनली आहेत. एटीएम सेंटर मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले असले, तरी त्यांचा उपयोग केवळ नावापुरता किंवा दिखाव्यासाठी होत असल्याची चर्चा होताना दिसत आहे.

सीसी कॅमेरे, गार्डच नाहीत
शहरातील बहुतांश एटीएम सेंटरवर सुरक्षा रक्षक नाहीत. त्यामुळे चोरांना चोरी करण्यासाठी मनसोक्त वेळ मिळत आहे. तोंडाला बांधून आल्याने सीसीटीव्ही मध्ये प्रथमदर्शी ओळखण्यास अडचण येते. तसेच तपास करण्यास देखील वेळ लागतो. एटीएम सेंटरवर अत्याधुनिक यंत्रणेचा अभाव आढळत असून सीसीटीव्ही च्या आधारे तात्काळ प्रतिसाद देखील मिळत नाही. त्यामुळे या चोरांचे आयतेच फावते आहे. बँकांनी सुरक्षेच्या या बाबींकडे लक्ष दिल्यास एटीएमकेंद्रामध्ये होत असलेल्या चोर्‍यांवर मोठ्या प्रमाणात आळा बसेल.