पिंपरी-चिंचवड : नोटाबंदीनंतर एटीएमबाहेर लोकांच्या रांगा लागल्या होत्या. गेल्या दोन महिन्यांत परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच शहरासह राज्यभरात पुन्हा हेच चित्र पाहायला मिळत आहे. बहुतांश एटीएमच्या दरवाजावरच ‘कॅश’ नसल्याचे फलक लागले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरत असून, पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये याचा उद्रेक होऊन सोमवारी बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएमची तोडफोड करण्यात आली. मंगळवारीदेखील शहरात चोहीकडे नोटाटंचाईचे चित्र दिसून आले. स्टेट बँकांचे विलीनीकरण आणि ‘मार्च एंड’मुळे ही स्थिती उद्भवल्याचे कारण बँकांकडून देण्यात आले. दोन दिवसांत परिस्थिती सुधारेल, असेही सांगण्यात आले. परंतु आता एप्रिलची 10 तारीख उजाडली तरी, बहुतांश एटीएम ‘कॅशलेस’च आहेत. यामुळे उन्हाच्या तापासोबतच नागरिकांना चलन तुटवड्याचा तापही सोसावा लागत आहे.
सांगवीत एटीएम फोडले
नोटाटंचाईने त्रासलेल्या ग्राहकांचा संयम सुटल्याने सोमवारी काही जणांनी सांगवीतील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएमची तोडफोड केली होती. शनिवार, रविवार बँकांचे कामकाज बंद असल्यामुळे नागरिक सोमवार उजाडण्याची प्रतीक्षा करीत होते. सोमवारीसुद्धा पैसे न मिळाल्याने संतप्त नागरिकांनी सांगवीतील एटीएमची तोडफोड केली. मंगळवारीदेखील शहरात एटीएममध्ये खडखडाटच दिसून आला. जेथे नोटा होत्या तेथे रांगा लागलेल्या होत्या. पुणे तसेच पिंपरी-चिंचवड शहरांतील जवळपास सर्व खासगी आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या एटीएममध्ये गेल्या काही दिवसांपासून खडखडाट दिसून येत आहे. ऐन पगाराच्या काळात एटीएममधून पैसेच निघत नसल्याने कामगार वर्गामधून संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील मध्य वस्तीबरोबरच उपनगरांमधील बहुसंख्य एटीएमवर ‘नो कॅश’ चे बोर्ड लागले दिसत आहेत. ज्या काही मोजक्या ठिकाणी पैसे आहेत, तेथे केवळ 2 हजार रुपयांच्याच नोटा उपलब्ध आहेत.
खासगी बँकांनी नोटा भरल्या नाहीत..
रिझर्व्ह बँकेच्या करन्सी चेस्टमधून खासगी, राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांना सारख्याच प्रमाणात नोटा मिळत आहेत़ नोटांचा तुटवडा नाही़ लोकांनी डिजिटल व्यवहाराकडे वळावे यासाठी खासगी बँकांनी एटीएममधील नोटा भरणा करण्याचे प्रमाण कमी केल्याने एटीएम रिकामी झाली आहेत़ त्याचा ताण सरकारी बँका व त्यांच्या एटीएमवर आला आहे, अशी माहिती बँक फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली.