मुंबई : नोटाबंदीनंतर उसळलेला चलनकल्लोळ पुन्हा डोके वर काढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात अनेक एटीएममध्ये खडखडाट असल्याचे चित्र आता पुन्हा पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे बँकांबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. तसेच एटीएममध्ये पैसे का नाहीत, याचे कारण मात्र अद्याप समजलेले नाही.
मुंबई आणि पुणे शहरासह अनेक ठिकाणी एटीएम गेल्या तीन-चार दिवसांपासून रिकामे आहेत. त्यामुळे ग्राहकांची पैसे काढण्यासाठी धावाधाव सुरू आहे. जिथे एटीएममध्ये रक्कम असल्याची माहिती मिळते, त्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड उडते आहे. नोटाबंदीनंतर ओढावलेली स्थिती पुन्हा एकदा अनुभवायला मिळत आहे. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात बँकांबाहेर ज्याप्रकारे रांगा लागत होत्या, त्याची पुनरावृत्ती होत आहे. गेल्या आठवड्यातही एटीएममध्ये पैसे नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे ही स्थिती पूर्ववत कधी होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.