एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी गजाआड

0

गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे, तलवार, मिरची पावडर जप्त; वाकड पोलिसांची कारवाई

पिंपरी-चिंचवड : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीच्या वाकड पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे, तलवार यांसारखी घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई काळेवाडी येथे रविवारी (दि. 29) पहाटे साडेचारच्या सुमारास करण्यात आली. विनोद निजाप्पा गायकवाड (वय 24, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), अनिरुद्ध उर्फ विकी राजू जाधव (वय 21, रा. जाधव वस्ती, रावेत), प्रेम उर्फ सनी चोपडे (वय 19, रा. जाधव वस्ती, रावेत), किरण खवले (वय 20, रा. ओटा स्कीम, निगडी), शिवकुमार बनसोडे (वय 24, रा. रावेत), गंगाधर नाटेकर (वय 19, रा. रावेत) अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत.

तर दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीत अक्षय साबळे (रा. आकुर्डी, पुणे), नजीम शेख (रा. काळेवाडी), ऋतिक उर्फ मंग्या रोकडे (रा. चिखली), करण रोकडे (रा. चिखली), दिनेश रेनवा (रा. चिखली), सोन्या उर्फ अविनाश जाधव (रा. रावेत), सागर जाधव (रा. रावेत) आणि राजू वनकर (रा. रावेत) यांचाही समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील सर्व आरोपी संगनमत करून अनधिकृतपणे शस्त्र बाळगताना आढळले. सर्वजण मिळून काळेवाडी येथील अनंत प्लाझा बिल्डिंग मध्ये असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएम सेंटरवर दरोडा टाकणार होते. वाकड पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी या टोळीतील सहा आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून तीन गावठी पिस्तूल, चार जिवंत काडतुसे, एका बांबूचा तुकडा, एक तलवार, एक कोयता, एक नायलॉन दोरी, एक मिरची पुडा आणि एक मोटारसायकल असा एकूण एक लाख 42 हजार 860 रुपयांचा ऐवज जप्त केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.