एटीएमवर सुरक्षा रक्षक न नेमणार्‍या बँकांवर दाखल व्हावा गुन्हा

खान्देशात तीन ठिकाणी एटीएम फुटूनही चोरट्यांचा शोध लागेना : पोलिसांचा तपास कागदावरच

भुसावळ (गणेश वाघ) : जळगाव जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात दोन तर धुळे जिल्ह्यात एक एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडून सुमारे 30 लाखांहून अधिक रक्कम लांबवण्यात चोरट्यांना यश आले तर बोदवडच्या घटनेनंतर लांबवण्यात आलेल्या रकमेचा आकडा थेट 60 लाखांवर पोहोचला. असे असलेतरी चोरट्यांना पकडण्यात यंत्रणेला यश आलेले नाही. अनेकदा चोरी करणारी टोळी ही परराज्यातील असल्याने व तांत्रिक तपासातही चोरटे सावधानता बाळगत असल्याने पोलिसांचे हात त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत हेदेखील तितकेच खरे. कोट्यवधींचा नफा कमवणार्‍या राष्ट्रीयकृत बँका महिन्याकाठी दहा-बारा हजार रुपये वेतनाचा सुरक्षा रक्षक नेमत नाही या इतके दुर्दैव नाही त्यामुळे हा हलगर्जीपणा न मानता बँकांचा दोष असल्याचा ठपका ठेवून बँकांवर गुन्हे दाखल झाल्यास अशा घटनांना आळा घालता येणार आहे.

सहा महिन्यात तीनदा एटीएम फोडले
सन 2022 मध्ये जानेवारी ते जुन दरम्यान जळगाव जिल्ह्यात दोन ठिकाणी तर धुळे जिल्ह्यात एका ठिकाणी गॅस कटरने एटीएम फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे सोमवार, 25 रोजी बोदवडमध्ये 31 लाखांची रोकड लांबवण्यात आल्याची भर पडली आहे. गेल्या काही वर्षाच्या आकडेवारीचा विचार केल्यास गुन्ह्यांची संख्या शेकडोत तर लांबवण्यात आलेल्या रकमेची संख्या कोटींमध्ये पोहोचते. पोलिसांकडून या घटनांचा तपास सुरूवातीला अत्यंत बारकाईने होत असलातरी काही दिवसातच हा तपास भरकटतो व पुन्हा नव्याने झालेल्या गुन्ह्यांकडे तपास वळतो असाच काही प्रकार होत असल्याने गुन्हेगारांच्या पथ्थ्यावर ही बाब पडते. केवळ बैठका घेवून पोलिस प्रशासन बँकांना सुरक्षा रक्षक नेमण्याबाबत पत्रव्यवहार करते मात्र कायद्याचा प्रभावी वापर केल्यास प्रत्येक बँक सुरक्षा रक्षक नेमून अलर्ट होईल व अप्रिय प्रकारांना पायबंद बसतील हेदेखील खरे !

  • खान्देशात एटीएम फोडण्यात आलेल्या घटना अशा
  • 26/01/2022 : जामनेर शहरातील पाचोरा रस्त्यावरील आयडीबीआय बँकेचे एटीएम गॅस कटरने फोडत सुमारे 12 लाख 78 हजारांची रोकड लांबविल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. विशेष म्हणजे संपूर्ण चोरी करतांना चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले.
  • 09/03/2022 : जळगाव शहरातील पिंप्राळा रोडवरील प्रेम नगर पेट्रोल पंपाजवळील बँक ऑफ इंडियाचे एटीएम 8 मार्चच्या मध्यरात्री चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने त्यात यश आले नाही. जळगाव जिल्ह्यात नाशिक परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील आले असतानाच ही घटना उघडकीस आली हे विशेष
  • 03/04/2022 : जळगाव तालुक्यातील जळके गावातील बसस्थानकाजवळ स्टेट बँक एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरे तोडून ते मशीन फोडण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक बाब रविवार, 3 एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली मात्र सुदैवाने चोरट्यांच्या प्रयत्नांना यश न आल्याने त्यांना रीकाम्या हाती परतावे लागले.
  • 31/05/2022 : कासोदा, ता.एरंडोल व नेरी, ता.जामनेर येथे 31 मे 2022 एटीएम फोडून सुमारे दहा लाखांची रोकड लांबवण्यात आली. कासोद्यात गॅस कटरच्या मदतीने युनियन बँकेचे एटीएम फोडून 9 लाख 55 हजार रूपयांची रोकड लांबवण्यात आली तर नेरी दिगर येथील शॉपिंग कॉम्प्लेक्समधील टाटा इंडीकॅश कंपनीचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या मदतीने फोडून 43 हजार 500 रुपयांची रोकड लांबवण्यात आली.
  • 20/07/2022 : धुळ्याजवळील फागणे गावाजवळील एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन बुधवार, 20 जुलै पहाटे अडीच वाजता फोडण्याचा प्रयत्न झाला मात्र अलर्ट चोरट्यांना धुळे तालुका पोलिसांची चाहूल लागल्याने त्यांनी काढता पाय घेतला मात्र तालुक्यातील कापडणे गावातील सीसीटीव्हीवर ब्लॅक स्प्रे मारत चोरट्यांनी टाटा इंडिकॅश कंपनीचे एटीएम फोडून सुमारे साडेपाच लाखांची रोकड लांबवण्यात चोरटे यशस्वी झाले. दोन्ही घटनेतील चोरटे एकच असल्याचे स्पष्ट झाले.