एटीएम कार्डची माहिती विचारून 19 हजारांचा गंडा

0

भोसरी : बँकेतून बोलत असल्याचे सांगून एटीएम कार्डची गोपनीय माहिती विचारून घेत एका इसमाची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2016 मध्ये भोसरी येथे घडला. मिखारी पाल (वय 40, रा. भगतवस्ती, भोसरी) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव असून, पाल यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी अनोळखी मोबाईलधारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

साडेएकोणीस हजारांची फसवणूक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी मोबाईलधारकाने पाल यांच्या मोबाईलवर फोन करून आपण बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे असलेल्या बँकेचे एटीएम कार्ड बंद होणार असल्याचे सांगून एटीएम कार्डची गोपनीय माहिती घेतली. कार्डची गोपनीय माहिती घेऊन त्यांच्या बँक खात्यामधून ऑनलाईन व्यवहार करून 19 हजार 400 रुपयांची फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाल यांनी भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भोसरी पोलीस करत आहेत.