एटीएम कार्ड खराब झाल्याचे सांगत पोलीसाला घातला गंडा

0

तब्बल 40 हजारांचा फटका

पिंपरी : तुमचे एटीएम कार्ड खराब झाले आहे, असे सांगून एका पोलीस कॉन्स्टेबलला तब्बल 40 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार वाकडमधील डांगे चौक येथे घडला. याबाबत दिनकर एकनाथ भोसले (वय 55, रा. कावेरी नगर, पोलीस वसाहत वाकड), यांनी हरीशचंद्र यादव (रा. गीलनगर, मानवेल पाडा, विरार रोड) आणि एका अज्ञाताविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पैसे ट्रान्स्फर करताना प्रकार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनकर भोसले चतुःशृंगी पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहेत. जुलै 2017 मध्ये ते वाकड डांगे चौकातील एसबीआय एटीएम सेंटरमध्ये पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी गेले होते. पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी वेळ लागत होता. इतक्यात एका अज्ञात इसमाने दिनकर भोसले यांचे एटीएम कार्ड खराब झाल्याचे सांगितले. तसेच दिनकर भोसले यांच्याकडून एटीएम घेऊन परस्पर 40 हजार रुपये हरीशचंद्र यादव याच्या नावावर ट्रान्स्फर केले. याबाबत दिनकर भोसले यांनी सायबर क्राईम विभागाकडून चौकशी केली असता हरीशचंद्र यादव आणि अन्य एका अज्ञात इसमाने त्यांची फसवणूक केली असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी निष्पन्न, मात्र अटक नाही
आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नसून पुढील तपास वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव करीत आहेत. पोलिसांच्या घरी चो-या झाल्याच्या घटना घडत असताना प्रत्यक्षात पोलिसांनाच ठगवण्याचे प्रकार देखील उघडकीस आल्याने परिसरात चांगलीच चर्चा सुरु आहे. फसवणुकीच्या प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.