एटीएम केंद्रातील अपुऱ्या सुरक्षाव्यवस्थेवरून आरबीआयने बँकांना केले लक्ष

0

नवी दिल्ली-बँका आणि व्हाइट लेबल एटीएम केंद्रातील अपुऱ्या सुरक्षा उपायांवर रिझर्व्ह बँकेने ताशेरे ओढले आहेत. कालबद्ध कार्यक्रम आखून एटीएममध्ये पुरेसे सुरक्षा पुरवा अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिला. देशात दोन लाख सहा हजार एटीएम असल्याचे फेब्रुवारी अखेरपर्यंतच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. मात्र, यातील अनेक एटीएममध्ये पुरेशी सुरक्षा यंत्रणा नसल्याने ग्राहकांना आर्थिक फसवणुकीला सामोरे जावे लागले आहे.

या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने एप्रिल २०१७मध्ये एका परिपत्रकातून सर्व बँकांना याविषयी सूचित केले होते. बहुतांश एटीएम ही विंडोज एक्सपी अथवा अन्य जुनाट यंत्रणेवर कार्यरत असल्याचे या परिपत्रकात म्हटले होते. जुनाट व एटीएम प्रणालीस पूरक नसलेली ऑपरेटिंग सिस्टीम तसेच प्रत्यक्ष एटीएम केंद्रात असलेली अपुरी सुरक्षा यामुळे ग्राहकांच्या हिताला बाधा पोहोचू शकतो तसेच, बँकांच्या प्रतिमेलाही धक्का बसू शकतो, असे रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

सूचना देऊनही पालन नाही
बँकांना यापूर्वी अनेकदा सूचना देऊनही एटीएमना पुरेशी सुरक्षा देण्याच्या कामातील प्रगती असमाधानकारक आहे. या परिपत्रकात सूचित केल्याप्रमाणे संबंधित उपायांची पूर्तता बँकांनी करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास बँकिंग नियमन कायदा (१९४९) व पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम्स अॅक्ट (२००७) नुसार कारवाई केली जाईल, असा इशारा रिझर्व्ह बँकेने दिला आहे. एटीएमच्या यंत्रात यूएसबी पोर्ट नसावेत, ऑटो रन सुविधा असल्यास ती बंद करावी, अत्याधुनिक ऑपरेटिंग सिस्टीम वापरावी आदी सूचना या परिपत्रकात करण्यात आल्या आहेत. येत्या सप्टेंबरपर्यंत २५ टक्के, डिसेंबरपर्यंत ५० टक्के व पुढीलवर्षी जूनपर्यंत १०० टक्के सुरक्षात्मक उपायांची पूर्तता करण्यास आरबीआयने बँकांना सांगितले आहे.

विदेशांमध्ये फसवणुकीसाठी क्लोनिंग कार्डचा वापर वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर देशातील ग्राहकांची सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने उपाययोजना करण्याची सूचना बँकांना केली आहे. दिल्लीतील एका महिलेचे एटीएम कार्ड क्लोन करून त्याचा वापर अमेरिकेत खरेदी करण्यासाठी झाल्याचे निष्पन्न झाले होते. कार्डवरून मोठ्या प्रमाणत खरेदी झाल्याचे मेसेज संबंधित महिलेला भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे १.३५ चे २.०९ वाजण्याच्या सुमारास आल्याने हा प्रकार उघडकीस आला.