मुक्ताईनगर- तालुक्यातील रुईखेडा येथील गोदावरी लक्ष्मण भंगाळे या वृद्ध महिलेच्या एटीएममधून कर्जाची रक्कम परस्पर काढण्यात आल्याची तक्रार करण्यात आली असून एटीएमद्वारे गैरव्यवहारातील कपात झालेली रक्कम परत मिळावी यासाठी त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड रुईखेडा शाखेच्या गोदावरीबाई भंगाळे या नियमित कर्जदार आहेत. विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मर्यादित रुईखेडे मार्फत त्यांनी बँकेकडून सन 2018-19 साठी 55 हजार 700 रुपयांचे पीक कर्ज घेतले आहे. त्यापैकी 20 हजार रुपये इतकीच रक्कम त्यांना अद्याप पावेतों मिळालेली आहे. त्यानंतर 22 मे 2018 ते 28 मे 2018 पर्यंत कोणत्याच एटीएममधून आपल्याला रक्कम मिळाली नाही. एटीएममध्ये कार्ड टाकल्यानंतर सॉरी अनेबल टू प्रोसेस असे लिहून आले व माझ्या खात्यातून रक्कम मात्र कपात झाली. कपात झालेली एकूण रक्कम तीस हजार रुपये असून ती पुन्हा माझ्या खात्यात वर्ग करण्याची त्यांची मागणी असलीतरी अद्यापही रकमेचा परतावा झालेला नाही. या संदर्भात जिल्हा बँकेच्या शाखेकडे 4 जून रोजी रीतसर तक्रारी अर्ज देखील देण्यात आला परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. बँकेत विचारणा केली असता ही रक्कम ग्राहकाला मिळालेली आहे, असे सांगण्यात आले.
रक्कम न मिळाल्यास गांधी जयंतीला आत्मदहन
यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे पिकेसुद्धा आलेली आहेत. त्यामुळे कर्ज रक्कम तर मिळालीच नाही पण व्याज व मुद्दल भरण्याची चिंतादेखील वृद्ध महिलेची वाढलेली आहे. त्यामुळे एटीएमद्वारे व्यवहारातील झालेली 30 हजार रुपयांची कपात झालेली रक्कम परत मिळावी, अशी मागणी गोदावरी लक्ष्मण भंगाळे यांनी मुख्य कार्यकारी संचालक यांना लिहिलेल्या अर्जाद्वारे केलेली आहे. 2 ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंतीपर्यंत मला उर्वरित रक्कम न मिळाल्यास मी बँकेसमोर आत्मदहन करेल, असा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.