एटीएम चोरट्यांचा धुमाकुळ

0

भुसावळ । जिल्हाभरातील सुरक्षा रक्षक नसलेल्या तीन एटीएमवर हात साफ करीत चोरट्यांनी साडे सात लाखांची रोकड लंपास केल्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे. भुसावळ, किनगाव आणि धानोरा अशा, चोरट्यांच्या हॅट्ट्रीकमुळे बँकांवर संक्रांतीच्या दिवशी मोठी संक्रात आली आहे. धानोरा येथे तोंड बांधून बँकेत प्रवेश करणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून भुसावळातून चोरीस गेलेली कार गुन्ह्यात वापरल्याचेही समोर आले आहे. या चोरट्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहे. भुसावळातील पंचमुखी हनुमान मंदिरासमोरील गुणवंत कॉम्प्लेक्समधील अ‍ॅक्सीस बँकेचे एटीएममध्ये चोरी करण्यापूर्वी या चोरट्यांनी सीसीटीव्हीच्या वायर्स कट करून कॅमेर्‍याची दिशा बदलली. तसेच गॅस कटरने कॅश ट्रे अलगदपणे लांबविला. म्युन्सीपल पार्कमधील रहिवासी महेश साळी (सावरकर रोड, भुसावळ) यांच्या मालकीची चारचाकी (एम.एच.19 क्यू.6365) या गुन्ह्यात वापरल्याचे समोर आले आहे.

जळगावकडे मोर्चा वळविल्याचा संशय
यावल तालुक्यातील किनगावच्या टाटा इंडिकॅश कंपनीच्या एटीएममधून गॅस कटरच्या सहाय्याने कॅश ट्रे मधून रोकड लांबवून चोरटे चोपडा तालुक्यात धानोर्‍यात धडकले. गावातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून तीन लाख 63 हजार 100 रुपये लांबवून चोरटे जळगावच्या दिशेने पळाल्याचा संशय आहे.

धानोर्‍यात 28 मिनिटात चोरी
धानोरा येथे 3 वाजून 42 मिनिटांनी एटीएम बाहेर एक चारचाकी आली. क्रुझर या चार चाकीतून तीन जण उतरले, त्यांनी तोंड बांधले त्यानंतर एकाने वर चढून सीसीटीव्हीचे तोंड वर फिरविले. यानंतर या चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून रोकड लंपास केली. पोलिसांच्या माहितीनुसार 3 वाजून 42 मिनीटे ते 4 वाजून 10 मिनिटा दरम्या ही चोरी झाली आहे. गावात सकाळी चोरीची घटना समजल्यानंतर एटीएमबाहेर ग्रामस्थांची एकच गर्दी झाली. बँकेला वारंवार सांगूनही सुरक्षा रक्षक नेमला जात नसल्याचे यावेळी काही ग्रामस्थांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज घेतले आहे.

अशी लंपास केली रोकड
3 लाख 63 हजारांची रोकड धानोर्‍यातून
3 लाख 14 हजारांची रोकड भुसावळातून
75 हजारांची रोकड किनगावातून लंपास करण्यात आली.

रिजनल ऑफिसरकडून सकाळी घटना कळाली. मी तत्काळ घटनास्थळी जाऊन आलो. सुरक्षारक्षक ठेवणे ही जबाबदारी सेंट्रल लेव्हलवरून ठरते, शिवाय एटीएमच्या प्रकारांवर अवलंबून असते, काही एटीएममध्ये एसी व सुरक्षा रक्षक असतात काहींमध्ये ते नसतात.
– शाकीद सौरभ अशोककुमार, व्यवस्थापक,