हिंगणा तालुक्यातून एटीएम फोडत चोरट्यांनी जळगाव जिल्ह्यात दाखवली कमाल ; बडोद्यातही उच्छाद
भुसावळ (गणेश वाघ )- भुसावळसह किनगाव व धानोर्यातील एटीएम फोडून जिल्हा पोलीस प्रशासनाची झोप उडवणार्या चोरट्यांनी सर्वप्रथम नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील डोंगरगाव येथील गुमगाव मार्गावरील बँक ऑफ इंडियाचे दोन एटीएम फोडून तब्बल 19 लाख 73 हजार 400 रुपयांची रोकडही लांबवल्याची खात्रीशीर माहिती आहे. शुक्रवार, 12 जानेवारी रोजी ही चोरी केल्यानंतर चोरट्यांनी रविवार, 14 रोजी मध्यरात्री भुसावळातील अॅक्सीस, किनगावातील टाटा इंडिकॅश व धानोर्यातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडल्याची माहिती तपासात समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यात तीनही ठिकाणी चोरी करण्यासाठी चोरट्यांनी शहरातील म्युन्सीपल पार्कमधून लांबवलेल्या महेंद्र मॅक्स जीपचा वापर केल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून उघड झाले आहे तर ही चोरलेली जीप बडोदा शहरातील अहमदाबाद मार्गावरून स्थानिक आरटीओ प्रशासनाने जप्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. बडोदा शहरातील सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांचा शोध सुरू आहे.
बडोद्यात वाहन जप्त ; चोरट्यांनी बदलवली नंबरप्लेट
भुसावळातील म्युन्सीपल पार्कातील महेश साळी यांच्या मालकिची महेंद्रा मॅक्स (एम.एच.19 क्यू.6365) चा जळगाव जिल्ह्यात तीन ठिकाणी चोरीसाठी वापर केल्यानंतर चोरटे चोपड्याहून बडोद्यापर्यंत पोहोचले मात्र नाकाबंदीमुळे पकडले जावू या भीतीने त्यांनी या वाहनाला जी.जे.17 क्यू.5682 हा बनावट क्रमांक लावल्याचे उघड झाले. चोरट्यांनी अहमदाबाद मार्गावर हे वाहन सोडल्यानंतर बडोदा आरटीओ प्रशासनाने हे वाहन जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.