पोलादपूर : शहरातील एस.टी.स्थानकासमोरील एक्सीस बँकेच्या एटीएम सेंटरमधून पैसे काढणार्या व्यक्तीचे पैशांचे पाकिट तिथेच पडून राहिल्यानंतर ते सापडलेल्या एटीएम सुरक्षा रक्षकाने ते परत केल्याबद्दल पोलादपूर पोलीस ठाण्यातर्फे त्याचा सत्कार करण्यात आला. एटीएममधून पैसे काढणार्याद सांगली जिल्ह्यातील कडेगांव येथील आनंदा नारायण तवर यांचे नोटांनी भरलेले पाकिट एटीएम सेंटरमध्येच राहिले आणि ते तेथील सुरक्षारक्षक म्हणून डयुटी बजावणार्या पोलादपूर तालुक्यातील चरई येथील विजय काशिराम साळवी यांना ते सापडले.
यानंतर साळवी यांनी आनंदा तवर यांचा शोध घेतला. मात्र, ते आढळून न आल्याने पोलादपूर पोलीसांच्या मदतीने त्यांच्याशी संपर्क साधून ते पाकिट आनंदा तवर यांना परत केले. विजय साळवी यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक करण्यासह पोलादपूर पोलीस ठाण्याचे एपीआय प्रकाश पवार आणि पीएसआय अनिल अंधेरे यांनी आनंदा तवर यांच्या उपस्थितीत सुरक्षारक्षक साळवी यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.