पुणे । भारताच्या साकेत मायनेनी, एन. श्रीराम बालाजी यांनी एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेतील एकेरीत विजयी सलामी दिली, तर जी. प्रज्ञेशला पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. म्हाळुंगे-बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत ही स्पर्धा सुरू आहे. 30 वर्षीय साकेत मायनेनीने बोस्निया अँड हर्झगोविनाच्या टॉमीस्लाव ब्रकिचला 6-3, 4-6, 6-2 असे पराभूत केले. जागतिक क्रमवारीत 27 वर्षीय टॉमीस्लाव 248व्या, तर साकेत 907व्या क्रमांकावर आहे. भारताच्या श्रीराम बालाजीने इजिप्तच्या करीम-महम्मद मामूनवर 6-4, 6-2 अशी सरळ सेटमध्ये मात केली. ही लढत 1 तास सात मिनिटे चालली. जी. प्रज्ञेशला मात्र पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. अमेरिकेच्या इव्हान किंगने प्रज्ञेशवर 6-3, 6-3 अशी सरळ सेटमध्ये मात केली. तासभर ही लढत चालली.
अन्य लढतींत कझाखस्तानच्या अलेक्झांडर नेदोवयेसोवने भारताच्या विष्णू वर्धनवर 6-3, 4-6, 7-6 (6) असा संघर्षपूर्ण विजय नोंदविला. दरम्यान, पात्रता फेरीतील अखेरच्या लढतीत जपानच्या फ्रान्सच्या अँटनी एस्कोफीएरने भारताच्या सिद्धार्थ रावतवर 6-2, 6-3 अशी, तर क्रोएशियाच्या बोरना गोजोने भारताच्या एन. विजयसुंदर प्रशांतवर 6-1, 6-2 अशी मात केली आणि मुख्य फेरी गाठली. तसेच, जपानच्या काइची उचिडाने ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्सी पॉरीरिनवर 6-4, 6-2 असा आणि फ्रान्सच्या ह्युगो ग्रेनिएरने कझाखस्तानच्या तिमूर खबिबुलिनवर 6-2, 6-2 असा विजय नोंदविला आणि मुख्य फेरीतील प्रवेश निश्चित केला.
सुमित-नाओकीची आगेकूच
दुहेरीत भारताच्या सुमित नागलने जपानच्या नाओकी नाकागावाच्या साथीत विजयी सलामी दिली. त्यांनी पहिल्या फेरीत सिद्धान्त बांठिया-जयेश पुंगलिया या पुण्याच्या जोडीवर 7-5, 6-0 असा विजय नोंदविला. दुहेरीतील अन्य लढतींत मार्क पोलमन्स-ब्रायडन क्लेइन यांनी पेडा क्रस्टिन- त्सुंग हुआ यांग यांच्यावर 7-6 (2), 6-3 अशी मात.