भुसावळ– भुसावळसह किनगाव व धानोर्यातील एटीएम फोडून परप्रांतीय चोरट्यांनी तब्बल 19 लाख 73 हजार 400 रुपयांची रोकड लांबवत बडोद्याकडे पोबारा केला होता तर चोरीसाठी भुसावळातील चोरलेल्या वाहनाचा वापर केला होता. हे वाहन बडोदा पोलिसांनी जप्त केल्यानंतर गुरुवारी भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांनी बडोदा न्यायालयातून वाहनाचा ताबा मिळवला असून भुसावळकडे प्रवास सुरू केला आहे. या वाहनाच्या मदतीने चोरट्यांचा माग काढण्यास काहीशी मदत होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
तीन राज्यात चोरट्यांनी घातला होता धुमाकूळ
नागपूरजवळील हिंगणा तालुक्यातील डोंगरगाव येथील गुमगाव मार्गावरील बँक ऑफ इंडियाचे एटीएम दोन एटीएम फोडून चोरट्यांनी 19 लाख 73 हजार 400 रुपयांची रक्कम लांबवत भुसावळात रविवार, 14 जानेवारी रोजी पहाटे भुसावळच्या अॅक्सीसचे नंतर किनगाव, धानोर्यातील एटीएम फोडून बडोद्याकडे पोबारा केला होता. विशेष म्हणजे चोरीसाठी आरोपींनी भुसावळातील म्युन्सीपल पार्कातील महेश साळी यांच्या मालकिची महेंद्रा मॅक्स (एम.एच.19 क्यू.6365) चा जळगाव जिल्ह्यात तीन ठिकाणी चोरीसाठी वापर केला होता तर नाकाबंदीत पकडले न जाण्यासाठी बडोद्यात या वाहनाला जी.जे.17 क्यू.5682 हा बनावट क्रमांक लावला होता. बडोद्यात पोहोचलेल्या चोरट्यांनी बडोदा शहरातील अजवा रोडवरील एसबीआयच्या एटीएममधून चोरट्यांनी 13.88 लाख तर थारसली क्षेत्रातील एटीएममधून 94 हजारांची रोकड लांबवली होती तसेच अन्य चार ठिकाणी चोरट्यांनी एटीएम फोडले मात्र त्यात त्यांना यश आले नव्हते.
भुसावळच्या पोलिसांनी वाहन घेतले ताब्यात
बडोदा येथील मकरपूरा पोलिसांच्या ताब्यात असलेल्या चारचाकीचा गुरुवारी भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी बंटी सैंदाणे व शंकर पाटील यांनी ताबा घेत भुसावळकडे परतीचा प्रवास सुरू केला आहे. या वाहनात सिगारेट पाकिट, काही जुने पेपर्स, बिसलेरी बाटली आढळली असून त्यावरून आरोपींचा शोध घेतला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार मध्यप्रदेशातील छिंदवाडा पोलिसांनी एटीएम फोडणार्या टोळीच्या मुसक्या आवळल्या असून त्यांनी अनेक राज्यात चोर्या केल्याची कबुली दिली असून जळगाव जिल्ह्यातही या टोळीचा धुमाकूळ घातला असल्याची दाट शक्यता आहे. पोलीस तपासात लवकरच या बाबीचा उलगडा होणार आहे.