मुक्ताईनगर । येथील जी.जी. खडसे महाविद्यालयात मंगळवार 18 रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण कक्ष मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.आर. पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून एड्स नियंत्रणासाठी नैतिकता आवश्यक असल्याचे सांगितलेेे. तसेच एड्स आजारापासून वाचण्यासाठी घ्यावयाची काळजी विविध उदाहरणांद्वारे विषद केली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. रितेश गवई यांनी आपल्या व्याख्यानातून एड्स आजार होण्याची कारणे व त्याची लक्षणे व त्यावरील उपाययोजना या विषयावर सांगोपांग चर्चा केली.
यशस्वितेसाठी यांचे परीश्रम
दुसरे प्रमुख वक्ते डॉ. अमित तायडे यांनी एड्स आजारावरील समुपदेशनाचे महत्व व्यक्तिगत, कौटुंबिक व सामाजिक स्तरावर विषद केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील विद्यार्थी कल्याण विभागाचे समन्वयक प्रा. मो. इस्माई मो. हुसेन यांनी केले. तसेच त्यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाचे महत्व व स्वरुप विषद केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. पी.बी. ढाके यांनी तर आभार प्रा. मीर ताहिरा यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी व यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेेतले.