यावल। एडस् विषयीची योग्य माहिती नागरिकांपर्यंत पोहोचल्याशिवाय या आजाराबद्दल असलेली भिती दूर होणार नाही. त्यामुळे एड्बाबत जनजागृती आवश्यक आहे. त्यामुळे जनजागृतीच्या कार्यात सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन डॉ.गिरिष पाटील यांनी केले. यावल महाविद्यालयात एडस् जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. जिल्हा एड्स प्रतिबंधक नियंत्रण विभाग यावल ग्रामीण रुग्णालयातर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला.
प्रसंगांना सामोरे जाताना सावधगिरी बाळगावी
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये एड्बाबत जनजागृती व्हावी हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. प्रा. आर.डी. पवार अध्यक्षस्थानी होते. प्रा. पवार यांनी या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की, जीवनात अशा प्रसगांना सामोरे जाताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. याबाबत काही अडचणी आल्यास तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांचा सल्ला घ्यावा असे आवाहन कार्यक्रमास उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
याप्रसंगी मंचावर डॉ.परवीन तडवी, समुपदेशक वसंतकुमार संदानशिव, रविंद्र माळी, विनोद बोदडे उपस्थित होते. प्रा. डॉ. ए. ए. शेख यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुरलीधर माळी, हर्षा महाजन, घनश्याम पाटील, विशाल महाजन यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या 15 विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने रक्तचाचणी करून घेतली. तसेच या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शकांनी समुपदेशन केले.