भुसावळ। नगरपालिका रुग्णालयातर्फे शहरात एड्स तपासणी व उपचार केले जात आहे. या केंद्राची माहिती रेड रिबन क्लबच्या विद्यार्थीनींनी समाजात पोहचवावी, असे आवाहन पालिका रुग्णालयाच्या आरोग्य अधिकारी डॉ. किर्ती फलटणकर यांनी केले. येथील कोटेचा महिला महाविद्यालयात रेड रिबन क्लबतर्फे आयोजित एड्स जनजागृतीपर कार्यक्रमात विद्यार्थीनींना मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.
एड्स म्हणजेच मृत्यू ही संकल्पना बदलायला हवी
या विषयावर बोलतांना त्या म्हणाल्या की, एड्स हा आजार जरी जुना असला तरी आता त्यावर बर्याच प्रमाणात प्रभावी औषधोपचार करता येतात आणि एच1 व्ही+व्हीई पालकांची अपत्येही एच1 व्ही-व्हीई मध्ये वाढविता येतात. एवढेच नव्हे तर त्यांचे संसारही उत्तम प्रकारे होतात. त्यामुळे एड्स म्हणजेच मृत्यू ही संकल्पना आता बदलायला हवी आणि म्हणूनच आरोग्याच्या क्षेत्रातील नवनवीन माहिती रेड रिबन क्लबच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहचायला हवी, असे आवाहन केेले. या कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी कल्याण विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. जे.एस. धांडे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनात सांगितले की, रेड रिबन क्लबद्वारे विविध उपक्रम नेहमीच घेतले जातात आणि त्याद्वारे सामाजिक प्रबोधन केले जाते. डॉ. फलटणकर यांनी केलेले मार्गदर्शन महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी समाजापर्यंत पोहचवून नागरिकांचे नक्कीच प्रबोधन करतील, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. दिपाली पाटील यांनी केले. विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.डॉ. सुमित्रा पवार यांनी प्रास्ताविकज केले. रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. भुतडा यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर नेहा पाटील हिने आभार मानले.