जळगाव । एड्ससारख्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी आपण जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यासोबत समाजातील सर्व घटकांपर्यंत त्याची योग्य माहिती पोहचवून या महाभयंकर आजाराला हद्दपार करू शकतो असे मत जळगाव जिल्हा एड्स नियंत्रण विभागाचे कार्यक्रम अधिकारी संजय पहूरकर यांनी व्यक्त केले. मूळजी जेठा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने समाजात एड्स जनजागृती करण्यासाठी रेड रिबिन केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे. त्याअंतर्गत महाविद्यालयात एड्स जनजागृती करण्यासाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. आपण विद्यार्थी आपल्या गावात, परिसरात याची जागृती घडवून परिवर्तन घडवू शकतो असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. विद्यार्थ्यांनी रांगोळ्याही काढल्या परिसरात काढल्या होत्या.
160 स्वयंसेवकांची उपस्थिती
यावेळी महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीच्या परिसरात पोस्टर प्रदर्शन स्पर्धा घेण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी एड्सशी संबंधीत 25 पोस्टर्स तयार केलेले होते. त्याचे प्रदर्शन भरण्यात आले होते. एड्सच्या बाबतीत ‘शून्य गाठायचा आहे’ हा संदेश यावेळी देण्यात आला. यावेळी आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेत 10 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अतिशय आशयसंपन्न अशा रांगोळ्या यावेळी काढण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. योगेश महाले यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला सहा. कार्यक्रम अधिकारी प्रा. दिलवरसिंग वसावे व डॉ. पूजा पांडेय आणि एन.एस.एस.चे 160 स्वयंसेवक उपस्थित होत
तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन
यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयातील समुपदेशक रुपाली दीक्षित यांनी एच आय व्ही पसरण्याची कारणे, त्याची लक्षणे, त्याचे परिणाम याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी त्यानी एड्सबद्दल समाजात असणारे गैरसमज कोणते आहेत याविषयीही माहिती दिली. समुपदेशक दिपाली पाटील यांनीही एड्सची तपासणी करून घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. यावेळी एड्स नियंत्रण आणि जनजागृती करण्यासाठीची शपथही घेण्यात आली. तसेच कार्यक्रम अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. तर स्पर्धेत सहभाग घेणार्या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयातर्फे यावेळी सत्कार करण्यात आले. तर जनजागृतीपर पोस्टर सादर करण्यात आले.