डॉ. पवन चांडक यांचा स्तुत्य उपक्रम
पिंपरीः एचआयव्ही बाधितांच्या हितरक्षणासाठी पंढरीच्या विठुरायाला साकडे घालण्यासाठी डॉ. पवन चांडक हे सलग पाचव्या वर्षी आळंदी ते पंढरपूर अशी सायकलवारी करीत आहेत. डॉ. चांडक व त्यांचे सहकारी आकाश गीते या दोघांनी शुक्रवारी (दि.13) सकाळी ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन घेऊन आळंदी ते पंढरपूर या सायकलवारीला प्रारंभ केला. एचआयव्ही बाधितांचे मूलभूत हक्क, शिक्षण, आरोग्य आणि पुर्नवसनासाठी परभणी येथील होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्थेचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक हे अनेक वर्षे तळमळीने काम करीत आहेत. एड्सबाबत जनजागृती व पर्यावरणाचा संदेश पोहचविण्यासाठी ते सायकल प्रवास करतात. मात्र, पंढरीच्या पाडुरंगाला एड्सबाधित मुलांच्या संरक्षण व हितसंवर्धनासाठी साकडे घालण्यासाठी ते दरवर्षी त्यांनी आषाढी वारीच्या निमित्ताने सायकल वारी उपक्रम सुरू केला आहे.
वारीचे पाचवे वर्ष
या वारीचे यंदा पाचवे वर्ष असून 13 ते 15 जुलैदरम्यान ही वारी होत आहे. डॉ. चांडक व सहकारी आकाश गीते यांनी शुक्रवारी सकाळी आळंदीत माऊलींच्या समाधीचे दर्शन घेऊन पंढरीच्या दिशेने आपली सायकल वारी सुरू केली. पुणे शनिवार वाडा येथे जाऊन पुढे भिगवणमध्ये ते मुक्काम करणार आहे. 14 जुलै रोजी इंदापूर, वेळापुर मार्गे पंढरपुरात जाऊन विठ्ठल मंदिराचे दर्शन घेतली. नंतर 85 एड्सग्रस्त विद्यार्थांच्या पालवी प्रकल्पाला भेट देऊन 15 जुलै रोजी पंढरपूरपासून जवळ कुर्डुवाडी येथे वारीचा समारोप करणार आहेत.
कोणत्याही सुखसोयीशिवाय केवळ स्वयंसेवी संस्थ्यांच्या भेटी गाठी घेत हे दोघे जण साकयल वारी करत आहेत. डॉ. चांडक यांच्या होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्थेच्या माध्यमातून डॉ. चांडक व पत्नी आशा चांडक एड्सबाधित मुलांचा सांभाळ करत आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक होतेच, परंतु एड्स बाधितांसाठी सुरू केलेली सायकल वारी देखील कौतुकाचा विषय ठरत आहे.