नवी दिल्ली : वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. सी. मोदी यांची राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गुजरात दंगलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या तपास पथकात वाय. सी. मोदी यांचा समावेश होता. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नेमणूक समितीने मोदी यांच्या नियुक्तीस मंजुरी दिल्यानंतर मोदी यांची तात्काळ नियुक्ती करण्यात आली. कार्मिक विभागाने या संदर्भाचा आदेश जारी केला आहे.
मोदी हे आसाम-मेघालय कॅडरचे 1984 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. सध्या ते सीबीआयच्या विशेष संचालक पदावर कार्यरत आहेत. एनआयएचे महासंचालक शरदकुमार 30 ऑक्टोबर 2017 ला निवृत्त होत आहेत. वाय. सी. मोदी हे शरदकुमार यांच्याकडून एनआयएची सूत्र स्वीकारतील. मोदी हे 31 मे 2021 ला निवृत्त होणार आहेत.