लग्नानंतर सोडून जाणे आणि अन्य मुद्द्यांची हाताळणी करण्यासाठी अनिवासी भारतीयांच्या (एनआरआय) विवाहांची नोंदणी आधारशी जोडा, असा सल्ला एका आंतरमंत्रालयीन समितीने परराष्ट्र मंत्रालयाला दिला आहे. भारतात लग्न करणार्या भारतीय पासपोर्टधारकांची विशेष समिती असे या समितीचे नाव आहे. या समितीने 30 ऑगस्ट रोजी आपला अहवाल परराष्ट्र मंत्रालयाला सादर केला आहे. एनआरआय पतींनी लग्न केल्यानंतर महिलांना सोडून देणे आणि परदेशात नेल्यानंतर घरगुती हिंसा किंवा हुंड्यासाठी छळ करणे, अशा प्रकारापासून महिलांचे रक्षण करणे हा या अहवालाचा हेतू आहे.
भारतात होणार्या एनआरआयच्या लग्नांसाठी आधार आवश्यक करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे, असे या समितीतील एका सूत्राने एशियानेट वाहिनीला सांगितले. एखाद्या आरोपीचे प्रत्यार्पण करण्यासाठी घरगुती हिंसा हाही निकष मानावा, यासाठी भारताने प्रत्यार्पण करारांमध्ये सुधारणा करावी, अशीही शिफारस या समितीने केली. हा अहवाल केवळ अनिवासी भारतीयांसंदर्भात आहे, भारतीय मूळ असलेल्या अन्य कोणत्याही व्यक्तींशी तो संबंधित नाही, असेही या सूत्राने सांगितले.