पुणे । राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफआयए) च्या खजिन्यात 162 दुर्मिळ, दर्जेदार चित्रपटांची भर पडली असून यातील 125 चित्रपटाच्या ड्युप (मुळ) निगेटीव्ह संग्रहालयाला मिळाल्या आहेत. यामध्ये 44 चित्रपट हे ब्लॅक अँड व्हाईट आहेत, तर 15 चित्रपट प्रदर्शित झालेले नाहीत. याशिवाय 34 गुजराती, 15 मराठी, 2 नेपाळी आणि 6 भोजपुरी भाषेतील चित्रपटांचा समावेश असून सदर दुर्मिळ खजिना फेमस सिनेलॅबरेटरी, मुंबई यांच्याकडून मिळाला असल्याची माहिती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदुम यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नॅशनल फिल्म हेरीटेज मिशनचे संतोष अजमेरा उपस्थित होते.
सिनेमा जतन करण्याचे आव्हान
नॅशनल फिल्म हेरीटेज मिशन अंतर्गत सध्या सुरू असलेल्या चित्रपटाच्या जतनाचे काम सध्या जोरात सुरू आहे. या मिशन अंतर्गत आम्ही विविध संस्था, व्यक्तींना त्यांच्याकडे असलेल्या दुर्मिळ फिल्म, लघुपट एनएफआयएला देण्याचे आवाहान केले होते. त्या अवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ब्लॅक अँड व्हाईट सिनेमांच्या प्रोसेसिंगवर काम करणार्या प्रमुख लॅबरेटरीमध्ये फेसम सिनेलॅबरेटरीचा समावेश आहे. या सिनेमांचे जतन करणे अधिक आव्हानात्मक आहे. लॅबकडे असलेले सर्व चित्रपट हे अत्यंत चांगल्या स्थितीतील आहेत, यामुळे यांचे डिजिटलायजेशन करणे तुलनेने सोपे असणार आहे, असे मगदुम यांनी यावेळी सांगितले.
या चित्रपटांचा आहे समावेश
या दुर्मिळ खजिन्यात विठ्ठलभाई झव्हेरी यांच्या ‘महात्मा‘ या महात्मा गांधीवरील तब्बल सहा तासाच्या चित्रीकरणाची ड्युप निगेटीव्ह आहे. याशिवाय खजिन्यात सात हिंदुस्तानी, सितारा, दिलीपकुमार यांचा कोहिनूर, पृथ्वीराज चव्हाण (1959), अंबर (1952), कुंवारा बाप (1976), मराठी सिनेमा बन्याबापू, टोकियो ऑलंम्पिकच्या ड्युप निगेटीव्हचा समावेश आहे. याशिवाय अभिनेत्री नर्गीस यांचा शेवटचा चित्रपट दिन और रात, जयंत पाठारे यांची 1973 सालची आलय तुफान दर्याला, मिठी घर (नेपाळी) आदी चित्रपटांचा समावेश आहे. तसेच सुर्यकांत आणि स्वर्ग से प्यारा घर या दोन चित्रपटांच्या ट्रेलरचा समावेश असल्याचे मगदुम यांनी सांगितले.