एनएमएमटी बस बंद पडणे बनले रोजचे रडगाणे

0

उरण ।उरण मार्गावरच्या एनएमएमटीच्या गाड्या सतत आलटून पालटून बंद होण्याच्या घटना सध्या दररोज घडत असल्याने या मार्गावरून प्रवास करणारे प्रवाशी अक्षरशः बेजार झाल्या आहेत. विशेष म्हणजे एकाच मार्गावर एकाच दिवशी दोन दोन गाड्या या बंद पडत असल्याने या मार्गावर सतत भंगार गाड्या पाठविणार्‍या एनएमएमटी प्रशासनाला प्रवाशाकडून लाखोल्या वाहिल्या जात आहेत. उरणमधून वाशी, जुईनगर आणि कोपरखैरणे आदी ठिकाणी जाणारी प्रवाशी संख्या खूप आहे. त्यातच जेएनपीटी बंदराच्या अनुषंगाने या ठिकाणी कामानिमित्त येणार्‍या नागरीकांची संख्या खूप मोठी आहे.

या बंदराच्या अवजड वाहनांची वाहतूक आणि प्रवाशी वाहतूक यासाठी एकच रस्ता असल्याने करल फाटा ते गव्हाण फाटा मार्गे बेलापूर या रस्त्यावरची वाहतूक कोंडी ही तर येथील जनतेच्या पाचवीलाच पुजलेली आहे. गाड्याची संख्या ही फारच कमी असल्याने गुरे ढोरे भरल्यासारखी माणसे भरून या मार्गावरून एनएमएमटीच्या गाड्या चालतात मात्र गेल्या काही महिन्यांपासून या मार्गावर गाड्या या ब्रेक डाऊन होण्याचे प्रमाण भयंकर वाढले आहे. एका एका दिवसाला दोन दोन गाड्या या देखील बंद पडू लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना या मार्गावरचा प्रवास नकोसा झाला आहे. विशेष म्हणजे नवी मुबंई महानगर पालिकेच्या परीवहन विभागातला उरण हा मार्ग सर्वात परिवहन सेवेला सर्वात आर्थिक फायद्याचा मार्ग म्हणून ओळखला जात आहे. या मार्गावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांना एनएमएमटी आणि एसटी वगळता दुसरा पर्याय नाही.