जळगाव । एन.एस.एस. ही समाज उत्थानासाठी काम करणारी चळवळ आहे. जागतिक स्तरावरील स्थिती पाहता एन.एस.एस.ने आता जागतिक शांततेसाठी काम करण्याची गरज आहे. एन.एस.एस. ही युवकांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करून सामाजिक बांधीलकी जपायला शिकविणारी शाळा आहे. या शाळेत आल्यावर विद्यार्थी स्वत:ला झोकून देऊन सामाजिक उन्नतीसाठी कटिबद्ध होतो, असे मत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे माजी संचालक प्रा. सत्यजित साळवे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. योगेश महाले यांनी केले. सप्ताहात राबविण्यात येणार्या कार्यक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी प्रा. दिलवरसिंग वसावे, डॉ. पूजा पांडेय तसेच एन.एस.एस.चे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन तुषार पाटील याने केले.
आपल्यासोबत दुसर्याच्या आयुष्यात परिवर्तन घडविण्याचे आवाहन
मूळजी जेठा महाविद्यालयात एन.एस.एस. स्थापना दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्रात जलयुक्त शिवार योजनेत आपल्या स्वयंसेवकांनी मूलभूत स्वरूपाचे काम केले आहे. देशभरातील एन.एस.एस.च्या युवकांनी ठरवले तर सामाजिक उत्थान घडून यायला वेळ लागणार नाही. आपल्यासोबत दुसर्याच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणण्याची ताकद एन.एस.एस.मध्ये आहे असेही ते म्हणाले. धर्म-जात यापलीकडे जाऊन देशात मानवता रुजवण्याचे काम आपण सर्वानी केले तर जागतिक शांतता नांदायला वेळ लागणार नाही असेही त्यांनी सांगितले. एन.एस.एस. च्या माध्यमातून आपण सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात परिवर्तन घडवण्याचे कार्य हाती घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.
मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयातील कला विद्याशाखेचे उपप्राचार्य डॉ. सुरेश तायडे उपस्थित होते. यावेळी बोलतांना सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात उजेड पेरणारे तुम्ही कार्यकर्ते आहात. तुमच्यात आणि इतरांमध्ये फरक आहे. समाजातील माणसांच्या दु:खावर फुंकर घालण्याचे अत्यंत मुलभूत काम तुम्ही करीत आहात. आयुष्यात पुढे जाण्यासाठी तुम्हाला एन.एस.एस.ची मदत निश्चितच होईल असे ते म्हणाले. ग्रामीण भागातील मुलांमध्ये सामाजिक मूल्ये रुजवा. समाजातील शेवटच्या माणसापर्यंत विविध योजना, ग्रामीण भागात चांगले काम करण्यासाठी एन.एस.एस.हे उत्तम माध्यम आहे असेही ते म्हणाले. यावेळी कार्यक्रमात विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.तर कार्यक्रमात विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.