वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने अण्विक पुरवठादार गटातील (एनएसजी) देशांना भारताच्या दीर्घकाल पडून असलेल्या सदस्यत्वासाठीच्या अर्जाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. एनएसजी गट आण्विक रसायने व शस्त्रास्त्रांच्या व्यापारावर नियंत्रण ठेवतो. चीनसह सध्या गटात ४८ सदस्य राष्ट्रे आहेत. नुकताच चीनने भारताला या गटात सहभागी करून घेऊ नका अशी भूमिका घेतली होती.
अमेरिकेच्या संरक्षण खात्याने काढलेल्या संयुक्त अहवालात अमेरिका भारताला गटात सहभागी करून घेण्यास उत्सूक आहे, असे म्हटलेले आहे. हा अहवाल अमेरिकी काँग्रेसपुढे ठेवण्यात आला आहे. २०१० पासून अमेरिका भारताला वास्सेनार अरेंजमेंट, एनएसजी, ऑस्ट्रेलिया ग्रुप आणि मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिम या गटांचे सदस्यत्व मिळावे यासाठी आग्रही आहे.
मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिमचा सदस्य म्हणून अमेरिकेने भारताचे स्वागत केले आहे. जुन २०१६ मध्ये आंतरखंडीय मिसाईल प्रसाराबाबत असलेल्या आचारसंहितेचे पालन करण्याचे वचन भारताने दिले असल्याचेही अहवालात म्हटले आहे. एनएसजीच्या बहुतांश सदस्यांचा पाठिंबा मिळविण्यात भारत यशस्वी झाला होता. परंतु अण्वस्त्र प्रसार बंदी करारावर भारताने सह्या कराव्या नंतरच गटाचे सदस्य घ्यावे असा चीनने आग्रह धरला. एनएसजी गटात बहुमताच्या जोरावर निर्णय न होता परस्पर सहमतीने निर्णय होत असल्याने भारताचा एनएसजी प्रवेश लांबणीवर पडण्यास चीन कारणीभूत ठरलेला आहे.