पुणे । स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना तुलनेत परीक्षा अत्यल्प जागांसाठी घेतली जात आहे. तसेच विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.या विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी परिषद (एनएसयुआय) सोमवार (दि. 26) पासून आठवडाभर राज्यात सर्व जिल्ह्यात तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती एनएसयुआयचे पुणे जिल्हाध्यक्ष भुषण रानभरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्पर्धा परीक्षेसाठी दरवर्षी जवळपास 22 लाख विद्यार्थी अर्ज करतात. त्यापैकी 10 लाख विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र होतात. असे असतांना राज्य शासनाने यावर्षी केवळ 69 जागा उपलब्ध केल्या आहेत. विद्यार्थी संख्या पाहता तुटपुंज्या जागांकरिता अर्ज मागविले जात असल्याने विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. हे असेच स्वरूप राहिले तर विद्यार्थी स्पर्धापरीक्षेकडे पाठ फिरवतील. असे एनएसयुआयचे राज्य प्रवक्ते अभिजीत हल्देकर म्हणाले. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यभर आंदोलने करण्यात येणार आहेत. या मागण्या 15 दिवसांत पूर्ण न झाल्यास मंत्रालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या या मागण्यांचे निवेदन पत्राद्वारे जिल्हानिहाय जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देण्यात येणार आहे. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर विविध मागण्या समोर आल्या आहेत. कार्यालयीन कामकाज करण्यासाठी मनुष्यबळ कमी असतांना शासनाकडून भरती प्रक्रिया पाहिजे त्या प्रमाणात केली जात नाही. सामान्य प्रशासानाच्या माहितीनुसार 1 लाख 77 हजार पदे रिक्त आहेत. पैकी 44 हजार पदे वर्ग एक व दोनची आहेत. त्याचप्रमाणे गृहविभागातीलदेखील सर्वाधिक पदे रिक्त आहेत.
विविध मागण्या
राज्यासेवेच्या प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील 450 पेक्षा जास्त जागा वाढविण्यात याव्यात, राज्य शासनाने प्रत्येक पदासाठी प्रतीक्षा यादी लावावी, संयुक्त परीक्षा रद्द करून पूर्वीप्रमाणे पिएसआय/ एसटीआय/ एएसओ या पदांकरिता स्वतंत्र परीक्षा घेण्यात यावी, एमपीएससीने तामिळनाडू पॅटर्न राबवावा.