अहमदाबाद : राफेल करारासंदर्भात एनडीटिव्हीच्या ट्रूथ विरुद्ध हाइप या कार्यक्रमामुळे मानहानी झाल्याचा दावा करत एनडीटिव्ही या वृत्तवाहिनीविरोधात अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहानं अहमदाबाद न्यायालयामध्ये 10 हजार कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. यात 10 हजार कोटी रुपयांची नुकसानभरपाईची मागणी रिलायन्सच्या वतीनं करण्यात आली आहे.
एनडीटिव्ही समूहाच्या सीईओ सुपर्णा सिंह यांनी, आम्हाला त्रास देण्यासाठी व घाबरवण्यासाठी हा दावा ठोकण्यात आल्याचे ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे. आम्ही या विरोधात लढणार असून प्रसारमाध्यमांना त्यांचं काम करू न देण्यासाठीच दावा ठोकण्यात आल्याचे त्यांनी म्हंटले. या प्रकरणाबाबत रिलायन्स समूहाच्या अधिकाऱ्यांना अनेकवेळा बोलावण्यात आले, त्यांना त्यांची बाजू मांडण्यास सांगण्यात आले, परंतु त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचे सुपर्णा यांनी म्हटले आहे. राफेल करारासंदर्भात एनडीटिव्हीच नाही तर सगळ्यांनी बातम्या दिल्या असूनही केवळ एनडीटिव्हीलाच नोटिस पाठवण्यात आल्याचे कंपनीनं म्हटले आहे.