भाजपची साथ सोडली असली तरी निवडणुका एकट्यानेच लढणार : सूत्र
पुणे : भारतीय जनता पक्षासोबत यापुढे युती करणार नसल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले असले तरी, आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)मध्ये सहभागी होईल, अशी शक्यता प्रसारमाध्यमांतून वर्तविली जात आहे. शिवसेनेने एनडीएत सहभागी होण्यासाठी खुद्द शरद पवार आग्रही आहेत, असेही वरिष्ठ पातळीवर बोलले जात आहे. तथापि, शिवसेना एनडीएमध्ये जाणार नाही. सर्व निवडणुकी देशपातळीवर स्वबळावरच लढवेल, अशी माहिती शिवसेनेच्या वरिष्ठस्तरीय नेतृत्वाने ‘जनशक्ति’शी बोलताना दिली आहे. शिवसेनेने देवेंद्र फडणवीस सरकारचा पाठिंबा काढावा व आघाडीसंदर्भात वरिष्ठपातळीवर चर्चा करावी, असा सल्ला माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठनेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना असे काहीही करणार नाही, असेही हे सूत्र म्हणाले. दरम्यान, राज्यात काँग्रेसपेक्षा शिवसेनेची ताकद मोठी आहे. त्यामुळे काँग्रेससोबत आघाडी करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी सांगितले. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार निवडणुका एकत्र घेण्यासाठी तयार असून, मुख्य निवडणूक आयुक्तांनीदेखील एकत्र निवडणुकांसाठी होकार दिला आहे. परिणामी, राज्यात सहा महिने अगोदरच विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता पाहाता, राजकीय पक्ष आतापासून कामाला लागले आहेत.
राष्ट्रीय पातळीवरदेखील शिवसेना एकट्यानेच लढणार
काँग्रेसप्रणित एनडीएमध्ये शिवसेनेच्या समावेशाबाबत शिवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांना विचारणा करण्यात आली असता, ते म्हणाले, की राष्ट्रीय पातळीवर एनडीएसोबत जाण्याचा काही प्रश्नच नाही. आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आम्ही देशपातळीवर स्वबळावर लढण्याचाच निर्णय घेतलेला आहे. तसेही राज्यात काँग्रेसपेक्षा शिवसेनेची ताकद मोठी आहे. उलट काँग्रेस अत्यंत अशक्त असून, त्यामुळे काँग्रेससोबत एनडीएमध्ये जाण्यात काहीही हाशील नाही, असेही खा. राऊत यांनी सांगितले. आगामी निवडणुकांत आम्ही स्वबळावरच लढू, आम्ही आमची ताकद दाखवून देऊ, असेही खा. राऊत यांनी सांगितले. सर्वप्रथम आम्ही काँग्रेसमुक्त भारताचा नारा दिला होता. इतके वर्षे त्यांच्याच विरोधात लढत आहोत, भविष्यात त्यांच्यासोबत जाण्याचा काहीच उद्देश नाही, असेही खा. राऊत म्हणाले. शिवसेनेचे दुसरे नेते अनिल देसाई यांनी शिवसेना काँग्रेससोबत आघाडी करण्याची शक्यता तर स्पष्टपणे फेटाळून लावली. आम्ही स्वबळावरच लढणार आहोत. तरीही आघाडी किंवा युतीचा निर्णय हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच घेतील, असेही देसाई यांनी सांगितले.
यूपीए मजबूत करण्यास पवारांचे प्राधान्य!
आगामी निवडणुकांत नरेंद्र मोदी यांचा विजयरथ रोखण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्रित यावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे दिल्लीत सूत्रे हलवित आहेत. त्यासाठी त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटीही घेतल्या आहेत. तसेच, संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए)च्या अध्यक्षा सोनिया गांधी यादेखील विरोधी पक्षाच्या नेत्यांशी सल्लामसलत करत आहेत. युपीए अधिकच बळकट करून विधानसभा व लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी रणनीती आखली जात असून, त्यासाठी सोनिया व शरद पवार यांनी जोरदार हालचाली चालविल्या आहेत. महाराष्ट्रातही शिवसेनेसह प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असा पवारांचा आग्रह आहे. त्यासाठी शिवसेना यूपीएमध्ये येईल का? याची चाचपणीही एक गट करत असून, त्यादृष्टीने हालचाली सुरु असल्याचेही वरिष्ठ पातळीवरील राजकीय सूत्राने सांगितले आहे. तथापि, या संदर्भात शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या प्रत्यक्ष बोलणी झालेली नाही, असेही या सूत्राने सांगितले आहे.