नवी दिल्ली । केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सोमवारी एनडीटीव्ही वृत्तवाहिनीचे सहसंस्थापक व कार्यकारी सहसंचालक प्रणव रॉय यांच्या घरावर छापा टाकला. यावेळी सीबीआयकडून प्रणव रॉय, त्यांची पत्नी राधिका रॉय आणि एका खासगी कंपनीविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. आयसीसीआय बँकेचे 48 कोटी थकवल्याप्रकरणी प्रणव रॉय यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. सीबीआयकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या नोंदीनुसार प्रणव रॉय यांनी आरआरपीआर होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसाठी बँकेचे 48 कोटी रूपये थकवल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी दिल्ली, देहरादूनसह चार ठिकाणी छापे टाकण्यात आल्याची माहिती सीबीआय अधिकार्यांकडून देण्यात आली.
यापूर्वी पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्यावेळी आक्षेपार्ह वार्तांकन केल्याचा ठपका ठेवत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून एनडीटीव्ही हिंदीवर एक दिवसाची बंदी टाकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, एनडीटीव्हीचे प्रमुख डॉ. प्रणव रॉय यांनी माहिती व प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांची भेट घेतल्यानंतर सरकारकडून या बंदीला स्थगिती देण्यात आली होती. त्यावेळी रॉय यांच्यावर सरकारशी तडजोड केल्याचा आरोप करत टीकाही करण्यात आली होती.
एनडीटीव्हीच्या तडजोडीवर नाराजी
तत्पूर्वी या बंदीविरोधात एनडीटीव्हीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. जानेवारी महिन्यात पठाणकोटमध्ये हवाई दलाच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यादरम्यान एनडीटीव्ही हिंदी या वृत्तवाहिनीने हवाई तळावरील मिग आणि लढाऊ विमाने, रॉकेट लाँचर्स, तोफगोळे, हेलिकॉप्टर्स आणि दारूगोळा याचा ठावठिकाणा सांगणारे तपशीलवार वार्तांकन केले होते. याप्रकरणी माहिती आणि प्रसारण खात्याने मंत्रिसमिती नेमली होती. या समितीने एनडीटीव्ही हिंदी वृत्तवाहिनीचे वार्तांकन आक्षेपार्ह असल्याचा ठपका ठेवला होता. या आधारे केंद्र सरकारने एनडीटीव्ही हिंदी वृत्तवाहिनीला एक दिवसांसाठी प्रक्षेपण बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार 9 नोव्हेंबर रोजी एनडीटीव्ही हिंदी वृत्तवाहिनीला प्रक्षेपण बंद ठेवावे लागणार होते. एखाद्या न्यूज चॅनलवर अशा प्रकारची कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ होती. एकीकडे या बंदीचे समर्थन केले जात होते, तर दुसरीकडे या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीकाही केली जात होती.