नवी मुंबई । आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ समजली जाणार्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने आता ऑनलाइन व्यवहारांकडे वाटचाल सुरू केली आहे. राज्यातील बाजार समित्या ऑनलाइन व्यवहारांबाबतीत मागे राहू नयेत, यासाठी सरकारने 145 बाजार समित्यांचे व्यवहार ऑनलाइन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार मुंबई बाजार समितीनेही ऑनलाइनचे पाऊल टाकले आहे. पहिल्या टप्प्यात कांदा-बटाटा बाजारातील व्यवहार ऑनलाइन पद्धतीने सुरू झाले आहेत.
सरकारकडून 145 बाजार समित्यांचे व्यवहार ऑनलाइन करण्याच्या सूचना
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी बाजार (ईनाम) अंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील 30 बाजार समित्यांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी अनेक बाजार समित्यांचे सर्व व्यवहार ऑनलाइन झाले आहेत. त्याच धर्तीवर उर्वरित म्हणजे 145 बाजार समित्यांचे व्यवहार ऑनलाइन करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार दुसर्या टप्प्यात जाहीर केलेल्या बाजार समित्यांमध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश आहे. 21 व्या शतकाची वाटचाल आधुनिक शहराकडे होत असताना आजही बहुतेक बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी येणार्या शेतमालाचा लिलाव हा बोली पद्धतीने होतो.
लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता येणार
तो ऑनलाइन पद्धतीने केला, तर लिलाव प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता येईल आणि कामाला गती मिळेल. त्याचबरोबर शेतकर्यांच्या आणि बाजार समित्यांच्या वेळेचीबचत होऊन शेतमालास स्पर्धात्मक भाव मिळण्यास मदत होईल, असा विश्वास सरकारला आहे. दरम्यान, एपीएमसीतील पाचही मार्केटमध्ये टप्प्याटप्प्याने व्यवहार ऑनलाइन करण्यात येणार आहेत. सुरुवातीला कांदा-बटाटा बाजारातील आवक-जावक मालाच्या नोंदी ऑनलाइन पद्धतीने करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे शेतकर्यांनादेखील फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे. डिजिटल क्रांतीच्या प्रवाहात कृषी मार्केट ऑनलाइन होणे आवश्यक झाले होते.