पुणे : पुणे- मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुन्या महामार्गावरील टोलच्या दरांमध्ये 1 एप्रिलपासून 18 टक्के वाढ होणार आहे. त्यामुळे द्रुतगती मार्गावरून प्रवास करणार्यांना टोलसाठी अधिकचे 35 रूपये मोजावे लागणार आहेत. सध्या या मार्गावरून प्रवास करणार्या हलक्या वाहनांसाठी 195 रूपये टोल आकारला जातो. 1 एप्रिलपासून 230 अशी टोलआकारणी होणार आहे. जुन्या महामार्गावरही हलक्या वाहनांसाठीची दरवाढ 16 रुपये असे, तर मल्टी अॅक्सेल वाहनांसाठी ती 90 रुपयांच्या आसपास असणार आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या टोलमध्ये दर तीन वर्षांनी 18 टक्के वाढ करण्याची अधिसूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने 2004 मध्ये काढली होती. त्यामुळे या अधिसूचनेनुसार टोलच्या दरात यामध्ये 35 रूपयांची वाढ होऊन हलक्या वाहनांसाठीचे टोलचा दर 230 रूपयांवर पोहचणार आहे. तर अवजड वाहनांसाठीचे टोलचे शुल्क 1317 रुपयांवरून 1555 इतके होणार आहे. दर तीन वर्षांनी 1 एप्रिलपासून ही दरवाढ लागू केली जाते. यापूर्वी 2014 मध्ये मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोलचे दर वाढविण्यात आले होते.
जुन्या मार्गावरील नवे दर
जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर 1 एप्रिल 2014 ते 31 मार्च 2017 पर्यंत हलक्या वाहनांसाठी 101 रुपये, ट्रक, बस अशा वाहनांसाठी 355 रुपये, तर मल्टीअॅक्सेलसाठी (अवजड वाहने) 763 रुपये अशी टोलआकारणी होत आहे. 1 एप्रिलपासून हलक्या वाहनांकडून 117 रुपये, बस, ट्रक आदी वाहनांकडून 411, तर अवजड वाहनांकडून 884 रुपये, अशी टोलआकारणी केली जाणार आहे. त्यामुळे यावाढीबाबत प्रवासी तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
टोलवसुलीत होणार घसघशीत वाढ
सध्याच्या प्रचलित टोलदरांनुसार द्रुतगती मार्गावर दर महिन्याला 42 कोटींची, तर जुन्या महामार्गावर 15 कोटींची वसुली होते. नवे दर अस्तित्वात आल्यानंतर ही वसुली अनुक्रमे 55 कोटी व 18 कोटींवर जाणार आहे.
एसटीची दरवाढ नाही
द्रुतगती व जुन्या महामार्गावरील टोलचे दर वाढल्यानंतरही एसटीच्या तिकिटदरात वाढ होणार नाही. तिकिटदराच्या वाढीत टोलचा मुद्दा अंतर्भूत नाही, असे एसटीचे विभागीय संचालक नितीन मैद यांनी जनशक्तिशी बोलताना सांगितले.