जळगाव । गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढउतार होताना दिसत आहे. एप्रिल महिन्यातच मे हिटचा तडाखा जाणवू लागला आहे. दुपारच्या सुमारास रस्ते ओस पडताना दिसत असून बाजारपेठांवरही याचा परिणाम जाणवू लागला आहे. रणरणत्या उन्हापासून संरक्षण म्हणून रूमाल टोप्यांना मागणी वाढली आहे. रसवंती व कोल्ड्रींक्सच्या दुकानांवर गर्दी वाढतांना दिसत आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले असून पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाभरात उन्हाचा तडाखा जाणवत आहे. गेल्या काही दिवसांपासून 40-42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. अशा परिस्थितीत उन्हापासून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एप्रिलमध्येच उन्हाचे चटके तीव्र झाल्याने मे महिना कठीण जाण्याची चिन्हे दिसत आहे.