जळगाव :- सर्व प्रक्रिया पूर्ण करून येत्या एप्रिल अखेरपर्यंत समांतर रस्त्यांच्या कामांना प्रत्यक्ष सुरूवात होईल, असे लेखी आश्वासन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज समांतर रस्ते कृती समितीला दिला. शासनाकडून मंजूर 100 कोटींमधून कृती समितीच्या मागणीनुसार प्राधान्यांने कामे केली जातील, वर्षभराच्या कालावधीत कामे पूर्ण होतील, अशी अपेक्षा असल्य जिल्हाधिकार्यांनी यांनी यावेळी सांगितले. जळगाव शहर समांतर रस्ते कृती समितीतर्फे पुकारण्यात आलेल्या आंदोलना प्रसंगी जिल्हाधिकार्यांनी हे आश्वासन दिले. तासाभराचे नियोजन व शिस्तबद्ध रास्ता रोका आंदोलन जिल्हाधिकार्यांच्या लेखी निवेदनानंतर मागे घेण्यात आले. शहारातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षवेधी होता. दरम्यान, एप्रिलअखेरीस कामाला सुरूवात न झाल्यास पुन्हा मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही कृती समितीतर्फे यावेळी देण्यात आला आहे.
जिल्हाधिकार्यांचे आश्वासन असे
तांत्रीक अहवाल बनविण्याचे काम 6 महिन्यांपासून प्रगतीपथावर आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून 100 कोटीच्या निधीस मान्यता मिळाली असून कृती समितीच्या मागणीनुसार प्राधान्य क्रमानुसार या 100 कोटींचा प्रकल्प अहवाल 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर दोन महिन्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन अंदाजे 24 एप्रिल पर्यंत कामाला सुरूवात होईल व वर्षभराच्या कालावधील काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. असे आश्वासन जिल्हाधिकार्यांनी दिले आहे.