जळगाव । दे शातील बड्या खाजगी बँकांनी रोखीच्या निशुल्क व्यवहारांवर बंधने आणल्याने सर्वसामान्यांत नाराजी होत असतांनाच सार्वजनिक क्षेत्रातील भारतीय स्टेट बँकेने त्यांचाच कित्ता गिरण्याचा निर्णय घेतला आहे. काही वर्षांआधी भारतीय स्टेट बँकेने अधिकाधिक खातेदार वाढावे यासाठी इंटरेस्ट रेट वाढवले, जनधनच्या माध्यमातून खाते उघडण्यात आले, पाचवर्षापूर्वी खात्यात किमान रक्कम शिल्लक ठेवण्याची मर्यादा ठेवली होती ती रद्द केली. मात्र बँकेने आता धोरण बदलले असून येत्या 1 एप्रिलपासून बचत खात्यात किमान रक्कम शिल्लक न ठेवणार्या ग्राहकांना दणका देण्याचा निर्णय भारतीय स्टेट बँकेने घेतला आहे. देशातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणार्या भारतीय स्टेट बँकेने एप्रिल पासुन कमी रकमेच्या ठेवीवर दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. नोटाबंदीच्या काळात नागरिकांना मनाप्रमाणे आर्थिक व्यवहार न करता आल्याने मनस्ताप सहन करावा लागला होता. अजुन व्यवहार सुरळीत होत नाही तोच बँकेने शुल्क वाढीचा निर्णय घेतल्याने नागरिकांमधुन नाराजी व्यक्त केली जात आहे. महानगरांमध्ये स्टेट बँकेच्या बचत खात्यात ग्राहकांना किमान पाच हजार रुपये ठेवणे आवश्यक असेल. किमान आवश्यक रकमेचा आकडा महानगर, शहर, गाव, खेडे यांसाठी वेगवेगळा असणार आहे. या रकमेच्या 75 टक्क्या पेक्षा कमी रक्कम खात्यात असल्यास 100 रुपये अधिक सेवाकर, 50 टक्कांपेक्षा कमी रक्कम असल्यास 50 रुपये अधिक सेवाकर असा दंड आकारला जाईल. ग्रामीण भागात हा दंड कमी असणार आहे. बँकांकडून छुपे खर्च आकारले जात असल्याने ग्राहकांमध्ये नाराजी आहे.
एसबीआय शाखांना अजुन निर्देश नाही
1 एप्रिल पासुन स्टेट बँकेच्या खात्यांवर बँकेने ठरवुन दिलेल्या नियमान्वये शिल्लक ठेवावी लागणार आहे. मोठ्या शहरांमध्ये 5 हजार, छोट्या शहरांमध्ये 3 हजार, निमशहरी भागांत 2 हजार आणि ग्रामीण क्षेत्रांत 1 हजार इतकी किमान रक्कम एसबीआय खात्यांमध्ये ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे. हा निर्णय भारतीय स्टेट बँकेकडून घेण्यात आला आहे मात्र स्टेट बँकेने त्यांच्या इतर शाखांना अजुन यानिर्णयासंबंधी अधिकृतरित्या कळविले नसल्याचे बँक अधिकार्यांनी सांगितले. संपुर्ण देशासाठी दंड आकरणीची एकच पध्दत असणार आहे. त्यामुळे बँक अधिकार्यांमध्येही संभ्रमावस्था आहे.
बँकांचा हा तुघलकी निर्णय
नोटाबंदीच्या निर्णयातून सावरण्याआधीच देशातील काही प्रमुख बँकांनी ग्राहकांना धक्का दिला आहे. 1 मार्च रोजी एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि अॅक्सिस बँक या देशातील तीन मोठ्या खासगी बँकांनी सर्व बचत आणि सॅलरी (वेतन) खात्यांवर होम ब्रँचमधून निश्चित केलेल्या मर्यादेक्षा अधिक रोखीचे देण्या घेण्याच्या व्यवहारांवर किमान 150 रुपये शुल्क लावण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आता ग्राहकाला होम ब्रँचमधून एका महिन्यात निश्चित रकमेपेक्षा जास्त किंवा चारपेक्षा जास्तवेळा पैसे काढायचे किंवा भरायचे असतील तर प्रत्येक व्यवहारावर किमान 150 ते एक हजार रूपयांपर्यंत शूल्क द्यावे लागणार आहे. या निर्णयावर ग्राहकांचा खिसा रिकामा करण्याची बँकांची ही मोहीम असल्याची टीका होत अरहे. बँकांचा हा तुघलकी निर्णय किती चुकीचा आणि अदूरदर्शी पणाची असल्याची टीका होत आहे.
नागरिकांमधील प्रतिक्रिया
वृध्दांनी वेतन, विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप, जनधनच्या माध्यमातून मोफत खाते उघडून घेतले आहे. कमी रकमेच्या शिलकीवर दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याने सामान्य नागरिकांमधुन या विरोधी प्रक्रिया उमटत आहे. बचत खात्याचा अर्थ काय होतो? सामान्य गोरगरिबांनी बचत करून पैसे बँकेत जमा करावे यासाठी सरकार प्रयत्न करते आणि वर सरकारी बँक जर असे नियम लागू करु लागल्या तर गरिबांनी बचत ठेवायची कुठे?, स्टेट बँकेने हा निर्णय 1 एप्रिलला लागू केला तर तर सर्व खातेदारांनी आपले खाते बंद करण्याचा निर्णय घ्या व यासाठी सूचना म्हणून आजच याबाबत बँकेला पत्र द्या कळू द्या सर्व सामान्याची ताकद, म्हणून म्हणतो बुलडाणा अर्बन मध्ये खाते उघडा कोणतेही छुपे खर्च नाहीत, शेतकरी 10 -10 रुपयांसाठी जिवाच पाणी करतात , कुठुन ठेवायचे येवढे पैसे खात्यात बिले भरता भारता सामान्य माणसाचे कंबरडे मोडू लागले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ने घेतलेला हा निर्णय अतिशय चुकीचा आहे.
रोखीचे तीन व्यवहार नि:शुल्क
स्टेट बँकेच्या खात्यातून महिन्याला रोखीचे तीन व्यवहार निशुल्क करता येणार आहे. तीन व्यवहारांपुढील प्रत्येक व्यवहारासाठी 50 रुपये व सेवाकर असे शुल्क आकारले जाणार आहे. स्टेट बँकेच्या खातेदारास स्टेट बँकेच्याच एटीएममधून पाचवेळा पैसे काढणे निशुल्क असेल. त्यापेक्षा अधिक वेळा पैसे काढल्यास प्रत्येक व्यवहारांवर 10 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. स्टेट बँकेच्या खातेदाराने इतर बँकेच्या एटीएममधून तीन वेळा पैसे काढल्यास त्यावर कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही. मात्र पुढे त्यासाठी 20 रुपयांपर्यंत शुल्क मोजावे लागेल. मात्र स्टेट बँकेच्या खातेदाराच्या खात्यात 25 हजारांपेक्षा अधिक रक्कम जमा असल्यास एटीएमद्वारे पैसे काढण्यावर कुठलेही शुल्क लावले जाणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे.