पुणे : रस्त्याच्या विरुद्ध दिशेने भरधाव जाणार्या दुचाकीची रस्त्यावर लावलेल्या बॅरीकेडला धडकुन अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराच्या मागे बसलेल्या तरुणीला जबर मार बसल्याने तिचा मृत्यु झाला. तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी रात्री साडे आठ वाजता फर्ग्यूसन रस्त्यावरील वाडेश्वर हॉटेलसमोर घडली. समृद्धि महेंद्र गुरसाले (वय 23) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. तर ऋषिकेश अरुण बाबर (वय 25, रा. रविवार पेठ, पोवई नाका, सातारा रस्ता) असे जखमी झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे.
ऋषिकेश हा त्याच्या दुचाकीवरुन फर्ग्युसन रस्त्यावरुन उलटया दिशेने वाडेश्वर हॉटेलकडे जात होते. दुचाकी भरधाव असल्याने रस्त्यावर लावलेल्या बॅरीकेडला दुचाकीची धडक बसली. समृद्धि दुचाकीवर पाठीमागे बसली होती. दुचाकी खाली पडल्याने तिला जबर मार बसुन तिचा मृत्यु झाला. ऋषिकेश ही गंभीर जखमी असून त्याच्यावर खासगी रुग्णलयात उपचार सुरु आहेत.