एमआयएमची शहर कार्यकारिणी बरखास्त

0

पिंपरी- वरिष्ठ नेत्यांचे होत असलेले दुर्लक्ष, कार्यकर्त्यांची होणारी कुचंबणा असा आरोप करत एमआयएमची शहर कार्यकारिणी बरखास्त करत असल्याचे पत्र शहराध्यक्ष अकील मुजावर यांच्यासह सर्वच पदाधिकार्यांनी पक्षश्रेष्ठ पाठविले आहे. शहराध्यक्ष अकिल मुजावर, महासचिव शफीमुल्ला काझी, प्रवक्ते धम्मराज साळवे यांनी याबाबतचे राजीनामा पत्र आमदार इम्तियाझ जलील यांना पाठविले आहे.

ऑल इंडिया मजलिस ए इतिहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाचे कार्य २०१६ पासून प्रामाणिकपणे अविरत कार्य करत होतो. फेब्रुवारी २०१७  च्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाचे १४ उमेदवार स्वबळावर दिले होते. या निवडणुकीत सर्व उमेदवारांनी कार्यक्षमपणे लढतही दिली. या निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रीय नेते खासदार असददुद्दीन ओवेसी यांची जाहीर सभा राज्य कोर कमिटीने नियोजित केली होती. या सभेसाठी आम्ही मोठ्या प्रमाणावर आर्थिक खर्च करून नियोजन केले होते. मात्र ऐंनवेळी ही सभा रद्द करण्यात आल्याने स्थानिक नागरिक तसेच पक्षातील कार्यकर्त्यांचा रोष आमच्यावर ओढला गेला, ही सभा रद्द झाल्यामुळे निवडणुकीवरही त्याचा परिणाम झाला. मोठ्या पराभवाला सामोरे जाऊन देखील खचून न जाता आम्हा पक्षाच कार्य सुरुच ठेवले असे पत्रात म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी देहूरोड येथे शिवसेनेचे उपनेते हाजी अराफत शेख यांच्या वडिलांच्या वादग्रस्त दर्ग्याच्या व देहूरोड मुस्लिम जमात दफनभूमी येथे पक्षाचे आमदार वारीस पठाण यांच्या हस्तक्षेपामुळे १७ निष्पाप युवकांवर गुन्हे दाखल झाले. यामुळे शहरातील उलेमा आणि मुस्लिम समाजसेवक व मुस्लिम संघटना नाराज झाले आहेत. आगामी काळात एमआयएम पक्षाला कोणत्याही प्रकारचे सहकार्य करणार नाही अशी भूमिका सर्वांनीच जाहीर केली आहे. महाराष्ट्र राज्य कार्यकारणी शहरात पक्षबळकट करण्यासाठी कार्य करत नाही.जनतेला पक्षाकडून कोणत्याही प्रकारचा न्याय मिळत नाही. त्यामुळे आम्ही पक्षात का कार्य करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणूनच पक्षाची कार्यकारिणी बरखास्त करून आम्ही सर्व पदाधिकारी राजीनामे देत असल्याचे राजीनामा पत्रात म्हटले आहे.