मुंबई | मराठा मोर्चा आणि सरकारने मराठा समाजाला दिलेल्या सवलतींबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत निवेदन देत असताना विरोधकांनी, “यह अंदर की बात है, एमआयएम और बीजेपी साथ-साथ है” अशी घोषणाबाजी सुरु केली. त्यावर चिडलेल्या मुख्यमंत्र्यांनी ‘मी जर बोललो, तर तुमची तोंड बंद होतील’ असा दम भरला.
मराठा समाजाच्या सवलतींबाबत मुख्यमंत्री माहिती देत असताना अचानक एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी त्यांना रोखलेच. जलील यांनी जोरदारपणे मुस्लिम आरक्षणाची मागणी करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका केली. सत्तेसाठी आतापर्यंत आघाडीने मुस्लिमांचा फक्त वापर केला, असा आरोप त्यांनी केला. त्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी आक्षेप घेतला. काँग्रेसचे आमदार सुनील केदार, वीरेंद्र जगताप, गोपालदास अग्रवाल, अमित देशमुख, यशोमती ठाकूर आणि राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांनी अध्यक्षांकडे धाव घेत मुख्यमंत्र्यांच्या समोर भाजपा-एमआयएम सेटींगच्या घोषणा दिल्या.
जलील यांच्या मुद्द्यावर मागच्या आघाडी सरकारने मुस्लीम समुदायाला पाच टक्के आरक्षण दिले होते, ते आरक्षण या भाजपा सरकारने का काढले याचा खुलासा सरकारने करावा, अशी मागणी विरोधीपक्षनेते विखे पाटील यांनी केला. त्यावर घटनेतील तरतुदीनुसार मुस्लीम समाजालाही आरक्षण दिले जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. घटनेनुसार मुस्लीम समाजातील काही घटकांना ओबीसी, अनुसूचित जाती आणि जमाती याबाबतचे आरक्षण मिळत आहे. या आरक्षणा व्यतिरिक्त आरक्षण देण्याबाबत येत्या एक महिन्यात मुस्लीम समुदायाच्या आमदारांशी बैठक घेतली जाईल. त्यानंतर मुस्लीम आरक्षणाबाबत पुढील भूमिका ठरवू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुस्लिमांचा फक्त वापर
काँग्रेस सरकारने केवळ मुस्लीम समुदायाची मते घेतली. त्यांच्या प्रगतीचा कधी विचार केला नाही. मुस्लिम समाजाचा जेव्हा-जेव्हा विषय येतो, तेव्हा केवळ एक-दोन मुस्लीम आमदार पुढे येतात, पण काँग्रेसचे इतर आमदार पुढे येत नाहीत.
– इम्तियाज जलील, एमआयएम