औरंगाबाद-औरंगाबादमध्ये जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी एमआयएम नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे. तर भाजपाच्या पाच गरसेवकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल शुक्रवारी औरंगाबाद महानगर पालिकेत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीचा ठरावावरून भाजपा आणि एमआयएम नगरसेकांमध्ये हाणामारी झाली होती. त्यानंतर बाहेर एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी भाजपा नेत्यांवर हल्ला केला होता. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्णाण झाले होते.
भाजपच्या पाच नगरसेवकांविरोधात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयएम नगरसेवक सय्यद मतीनने यांच्या जबाबावरून हा गुन्हा नोंद करण्यात आल्याचे क्रांती चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दादाराव शिनगारे यांनी सांगितले.
शुक्रवारी महानगरपालिकेची समांतर वाहिनीसंदर्भात विशेष सभा बोलाविण्यात आली होती. सभेच्या सुरुवातीला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात येत होती. याला एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांनी विरोध दर्शवला. यामुळे संतप्त होत सभागृहातील भाजप नगरसेवक प्रमोद राठोड, दिलीप थोरात, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे, राज वानखेडे यांनी मतीन यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्याच्या प्रस्तावास विरोध करणाऱ्या मतीन यांच्यावर कडक कारवाई करून गुन्हा नोंदवावा, तसेच त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापौरांकडे केली होती. या पार्श्वभुमीवर आज, शनिवारी मतीन यांना अटक करण्यात आली आहे.