एमआयडीसीतील केमिकल कंपनीत तिघांवर काळाचा घाल

जळगाव- एमआयडीसी परिसरातील समृद्धी केमिकल कंपनीच्या आवारातील जमिनीला लागून असलेल्या टाकीमधील साचलेले पाणी व गाळ काढताना तीन जणांचा शनिवारी दुपारी मृत्यू झाला. गाळाच्या टाकीत पडलेल्या एका कामगाराला वाचविण्यासाठी इतर दोन कामगारांनी प्रयत्न केले. मात्र, दोघांचे प्रयत्न अपयशी ठरले आणि या घटनेत त्या तिघांचा मृत्यू झाला.
हा गाळ काढण्यासाठी एका कामगाराला सांगितले होते. तो टाकीत उतरला. मात्र, तो गाळात फसत असल्यान त्याने मदतीसाठी आरडाओरड केली. त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न ठेकेदाराने केला. परंतु, तो सुद्धा टाकीत पडला. दोघांनी बचावासाठी आवाज दिल्याने तिसरा कामगार धावून गेला. मात्र, तो देखील गाळात फसला आणि तिघांचा गुदमरुन मृत्यू झाला.
अजिंठा चौफुलीला लागूनच असलेल्या अयोध्यानगर रस्त्यावरील ए सेक्टरमध्ये प्लॉट क्र.84, 85 वर सुबोध सुधाकर चौधरी व सुयोग सुधाकर चौधरी यांच्या मालकीची समृद्धी केमिकल्स नावाची रासायनिक खत निर्मितीसाठी लागणारे लिक्वीड, केमिकल तयार करण्याची कंपनी आहे. ही कंपनी अपर्णा सुयोग चौधरी यांच्या नावावर आहे. यात सुमारे 25 मजूर रोजंदारीवर कामावर आहेत. कंपनीला शनिवारी सुटी असल्याने संचालक सुबोध चौधरी यांनी सांडपाण्याची टाकी साफ करण्याचे सांगितले होते.
नातेवाईकांनी केला आक्रोश—
ही कंपनी तीन दिवसांपासून बंद असल्याने आवारातील सांडपाणी व वेस्टेज केमिकल साठवण्याच्या टाकीत सांडपाणी व गाळ साचला होता. साफसफाई करताना दिलीप अर्जुन सोनार (वय 54, मूळ खिरोदा, ह.मु. कांचननगर) यांचा पाय घसरला व ते टाकीत पडून सांडपाण्यात बुडाले. हा प्रकार लक्षात येताच त्यांच्या बचावासाठी मजूर ठेकदार रवींद्र ऊर्फ झगडू कोळी (वय 32, रा.चिंचोली, ता.यावल) यांनी हात देत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते सुद्धा टाकीत पडले. दोघांचा बचावासाठीचा आवाज ऐकून मयूर विजय सोनार (वय 30, रा. कांचननगर, जळगाव) हे मदतीसाठी धावले. पण, ते देखील टाकीत कोसळले. बराच वेळ झाल्याने तिघांचा गुदमरुन मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. इतर कामगारांनी तिघांना बाहेर काढले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात आणले असता तिघांचा मृत्यू झालेला असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन अहिरे यांनी जाहीर केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. दरम्यान, या घटनेबाबत तिघांच्या नातेवाईकांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बघताच नातेवाईकांनी आक्रोश केला.
घटनास्थळी पोहचला पोलीस ताफा—
या घटनेबाबत कळताच एमआयडीसी पोलिसांसह जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे व इतर अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी त्या टाकीची पाहणी करुन घटनाक्रम समजून घेतला. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे अधीक्षक डॉ.मुंढे यांनी सांगितले.