एमआयडीसीतील गोडाऊनमधून 2 ट्रॅक्टर प्लास्टिक जप्त

0

महाराष्ट्र प्रदूषण मंडळ आणि मनपाची कारवाई

जळगाव– राज्यात प्लास्टिक बंदी असतानाही सर्रासपणे वापर सुरु आहे.काही व्यापार्‍यांकडे प्लास्टिक साठा असल्याची माहिती मिळताच महाराष्ट्र प्रदूषण मंडळ आणि मनपाच्या पथकाने एमआयडीसीतील गोडाऊन तपासणी केली.दरम्यान, दोन ट्रॅक्टर प्लास्टिकचा साठा जप्त करुन विनय खानचंदाणी यांच्यावर पाच हजार रुपयाची दंडात्मक कारवाई केल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील यांनी दिली.
राज्यशासनाने 50 मायक्रॅान पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर बंदी आणली आहे. मात्र शहरात प्लास्टिक विक्री सर्रासपणे सुरु आहे. एमआयडीसीत विनय खानचंदाणी यांच्या गोडाऊनमध्ये प्लास्टिक साठा असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अधिकारी श्री.वावळे,मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील,आरोग्य निरीक्षक शरद बडगुजर,संजय अत्तरदे,के.के.बडगुजर,धिरज गोडाले,प्रवीण पवार,विशाल वानखेडे यांच्यासह पथकाने गोडाऊनमध्ये पाहणी केली.त्याठिकाणी प्लास्टिकचा साठा आढळून आला.
पाच हजार रुपये दंड
मनपाच्या पथकाने गोडाऊनमधील दोन ट्रॅक्टर प्लास्टिक साठा जप्त केला.तसेच प्लास्टिक व्यवसायिक विनय खानचंदाणी यांच्यावर पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे प्लास्टिक विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.