जळगाव। एमआयडीसी परिसरातील भारत पेट्रोलियम कंपनीजवळून जात असलेल्या दुचाकीस्वारास मागुन दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी अडवून मारहाण केली. यानंतर त्यांच्याजवळील मोबाईल व पैसे हिसकावून पळ काढला. ही घटना सोमवारी मध्यरात्री 12.30 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, याप्रकरणी दुचाकीस्वाराने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओव्हरटेक करुन रस्त्यात अडविले
म्हाडा कॉलनी येथील विकास गिरधर पाटील हे सोमवारी मध्यरात्री 12.30 वाजेच्या सुमारास एमआयडीसी परिसरातील एम सेक्टरजवळील भारत पेट्रोलियम कंपनीसमोरून जात होते. मागुन दुचाकीने भरधाव वेगात येत असलेल्या दोन तरूणांनी पाटील यांना ओव्हरटेक करत त्यांच्या दुचाकीसमोर दुचाकी उभी करून पाटील यांना अडविले. यानंतर त्यांना काहीही कारण नसतांना मारहाण केली आणि चाकुचा धाक दाखवून त्यांच्याजवळील साडे आठ हजार रुपयांची रोकड व एक मोबाईल असा दहा हजार पाचशे रुपयांचा ऐवज हिसकावून चोरून नेला. पाटील यांनी आरडा-ओरडा केली मात्र तेथे कोणीही नसल्याने चोरट्याना पळ काढण्यास यश आले. यानंतर दुसर्या दिवशी मंगळवारी विकास पाटील यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेत अज्ञात चोरट्यांविरूध्द तक्रार दाखल केली. त्यावरून दोन्ही चोरट्यांविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.